दिपक मोहिते,
” हल्लाबोल,”
महानगरपालिका काबीज करण्यासाठी आ.स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली भाजप सज्ज,
भाजपचे ज्येष्ठ नेते व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात ” आम्हाला आगामी निवडणुकांमध्ये कोणाच्या कुबड्यांची गरज नाही,” असे वक्तव्य केल्यानंतर राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून स्वबळाचा नारा दुमदुमू लागला आहे.पुणे,भंडारा,मुंबई,पालघर,ठाणे,नागपूर व अन्य जिल्ह्याचा त्यामध्ये समावेश आहे.ठाण्यात तर भाजपची सारी यंत्रणा शिंदे गटाची डाळ या निवडणुकीत शिजता कामा नये,यासाठी सक्रिय झाली आहे.भाजपने राजकीय पक्षाचे महत्वाचे नेते,पदाधिकारी व कार्यकर्त्याना आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
भाजपने पालघर जिल्ह्यातही असेच धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे.बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी,नेते व कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क सुरू झाला आहे.वसई विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे अनेकजण भाजपच्या वाटेवर आहेत.निवडणुका जाहीर झाल्यानंतर या प्रक्रियेला प्रचंड वेग येण्याची शक्यता आहे.ज्या इच्छुकांना उमेदवारी मिळणार नाही,अशांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी भाजपने ” ऍक्शन प्लॅन,” तयार केला आहे.प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे लवकरच जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावणार आहेत.एकनाथ शिंदे यांना ठाणे व पालघर जिल्ह्यातून तर माजी आ.हितेंद्र ठाकूर यांना वसई उपप्रदेशातुन हद्दपार करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आपली संपूर्ण ताकद पणाला लावणार असल्याचे सांगण्यात येत आहे.शिंदे गटाचे पदाधिकारी सुदेश चौधरी हे गेल्या काही महिन्यांपासून पक्षापासून दुरावले असून ते येत्या काही दिवसात भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.त्यांच्या सोबत विरार पूर्व भागातील असंख्य कार्यकर्ते देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.वसई तालुक्यात शिंदे गटाची ताकद नगण्य असून त्यांच्याकडे निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांचा दुष्काळ आहे.तसेच भाजपने स्वबळावर लढण्याचे ठरवल्यास आपले काही खरं नाही,अशा निर्णयाप्रत शिंदे गटाचे वरिष्ठ नेते आले आहेत.त्यामुळे या निवडणुकीत ते किती जागा लढवतील,हे सांगणे जरा कठीणच आहे.
भाजप,आगामी निवडणुकीपूर्वी बहुजन विकास आघाडीला खिळखिळी करण्याच्या प्रयत्नात आहे.महेश पाटील,धरेंद्र कुलकर्णी,नितीन ठाकूर व अन्य काही नेते भाजप मध्ये सामील झाल्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे.बहुजन विकास आघाडीचे दोन बडे नेतेही भाजपच्या संपर्कात असून सध्या त्यांची द्विधा मनस्थिती झाली आहे.बहुजन विकास आघाडीचे वसई गावातील जुने नेते,हे नव्याने दाखल झालेल्या तरुणांच्या नानाविध प्रतापामुळे चांगलेच नाराज असून ते इतर पक्षात जाणार नाहीत, पण पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याऐवजी निवांत घरी बसण्याच्या मनस्थितीत आले आहेत.काल पक्षात आलेले हे तरुण आम्हाला आदेश देतात,आम्ही यांचे आदेश पाळण्याऐवजी घरी बसू,असे एका ज्येष्ठ नेत्याने नांव न छापण्याच्या अटीवर माध्यमांना सांगितले.त्यामुळे भाजप ही महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत आपल्या ताब्यात घेईल अशी शक्यता आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्यात वसईतील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती,त्या बैठकीत त्यांनी वसई विरार शहर महानगरपालिका आपण जिंकलीच पाहिजे,त्यासाठी कामाला लागा.आणि कोणी दमदाटी वगैरे केली तर मी तुमच्या पाठीशी आहे.आजपासूनच कामाला लागा.असे आवाहन केले होते.त्यानंतर आ.स्नेहा दुबे पंडित व त्यांच्या टीमने गेल्या दीड महिन्यात विविध विकासकामांना सुरुवात तर😊 केलीच,पण इतर पक्षाचे पदाधिकारी,नेते व कार्यकर्त्यांना गाठण्यास सुरुवात देखीक केली.या कामामध्ये त्यांना बऱ्यापैकी यश मिळाले व अल्पावधीत पक्षाचा चांगला विस्तार होऊ शकला.

