दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
चौथी मुंबई ; मुख्यमंत्री फडणवीस यांचे ” मुंगेरीलाल के हसीन सपने,”
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या सीएनबीसी – टीव्ही १८ च्या ग्लोबल लिडरशीप समिट,मध्ये मुलाखत देताना,येत्या तीन वर्षात वाढवण बंदराचा पहिला टप्पा पूर्ण होईल,अशी ग्वाही दिली.तसेच या विषयी अधिक माहिती देताना येथील समुद्रकिनारी उभारण्यात येणाऱ्या विमानतळाला पण आता मंजुरी मिळाली आहे,असे स्पष्ट केले.या विकासकामामुळे नवी मुंबई येथे तिसरी मुंबई तर वाढवण परिसरात चौथी मुंबई आकाराला येणार आहे,असे त्यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या या निर्णयाचे पालघरवासीय नक्कीच स्वागत करतील,पण आज या जिल्ह्याची भौगोलिक,आर्थिक व सामाजिक परिस्थिती कशी आहे ? लोकांचे राहणीमान,त्यांचे दरडोई उत्पन्न,रोजगार व नागरी सुविधाचा सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा.त्यांना अभिप्रेत असलेल्या चौथ्या मुंबईची सद्यस्थिती कशी आहे ? आदिवासी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अकरा वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणतेही नियोजन न करता नव्याने पालघर जिल्ह्याची निर्मिती केली व जिल्ह्याला आदिवासी दर्जा दिला.सरकारच्या या निर्णयाचे आदिवासी समाजाने त्यावेळी तोंडभरून कौतुक केले.

त्या घटनेला आता अकरा वर्षे झाली,पण आजही जिल्ह्यातील हा समाज उपेक्षित जीवन जगतोय.अठरापगड दारिद्र्य,कुपोषण,तीव्र पाणीटंचाई,शिक्षणाचा बोजवारा,निरक्षरता आजही ” जैसे थे,” स्थितीत,चालायला धड रस्ते नाहीत,अशा विविध समस्यांमुळे जिल्ह्यातील लोकांचे जीवन दुर्धर अवस्थेतून जात असताना आपले मुख्यमंत्री चौथ्या मुंबईचे स्वप्न पाहत आहेत.वास्तविक त्यांचे हे स्वप्न ” मुंगेरीलालके हसीन सपने,” या पठडीतील आहे.

कोणे एकेकाळी ( सन २००० साली ) तत्कालीन मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांनी देखील वसईत झालेल्या एका कार्यक्रमात वसई विरार उपप्रदेशाचा ” तिसरी मुंबई,” म्हणून उल्लेख केला होता.पण त्यानंतरच्या पाव शतकात हा परिसर तिसरी मुंबई होण्याऐवजी ” बकाल मुंबई,” झाल्याचे पाहायला मिळाले.

अशा सर्व परिस्थितीत सध्याचे मुख्यमंत्री वाढवण क्षेत्र हे लवकरच तिसरी मुंबई म्हणून नावारूपाला येईल,असे गाजर उद्योगपतींना दाखवत आहेत.ही तिसरी मुंबई उभारण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती. डोळ्याखालून घालायला हवी.अनेक पाड्यावर चालायला धड रस्ते नाहीत,आजारी व्यक्ती व गरोदर महिलांना कापडाची झोळी करून तालुक्यात असलेल्या सरकारी रुग्णालयात आणावे लागते.शाळकरी मुले दररोज आपला जीव धोक्यात घालून शाळेत येजा करत असतात.अशा परिस्थितीमध्ये आपले सरकार चौथ्या मुंबईचे स्वप्न पाहते,त्यांच्या या धाडसाचे कौतुक करावे, तेवढे थोडेच,असेच म्हणावे लागेल….

