दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
” निवडणूक रणसंग्राम,”
तीन नगरपरिषदा व एक नगरपंचायतीच्या निवडणुकानंतर पालघर जिल्ह्याचे राजकीय चित्र पालटणार….
राज्यात पुढील महिन्यात नगरपरिषद व नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.त्यासाठी सर्व राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत.पहिल्या टप्यातील या निवडणुका पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्यात जिल्हा परिषद/पंचायत समिती,त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत.या निवडणुकीनंतर पालघर जिल्ह्याचे राजकीय चित्र पार बदलण्याची शक्यता आहे.
महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका साधारणपणे फेब्रु.२०२६ मध्ये होतील,असा अंदाज आहे.ग्रामीण भागातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या या निवडणुकीचा प्रचाराचा भर हा प्रामुख्याने विकासकामांवर असेल.तर शहरी भागात मात्र समाज रचना,कडवे हिंदुत्व व विकासकामे,हे तीन मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी असतील.भाजप,या निवडणुकीत प्रभागात कोणत्या समाजाचे प्राबल्य आहे,हे लक्षात घेऊन त्या समाजाच्या व्यक्तीला उमेदवारी देईल,असा अंदाज अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.भाजप सोबत असलेल्या इतर मातृसंघटना या भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ” कडवं हिंदुत्व,” चा आधार घेईल.इतर राजकीय पक्षाचा मात्र शहरी भागातील नागरी समस्या, प्रलंबित/प्रस्तावित विकासकामे व राजकारणाचा खालावलेला स्तर,यावर आपल्या प्रचाराचा भर ठेवेल.
दरम्यान भाजपने आपली निवडणूक प्रचार यंत्रणा कार्यान्वित केली असून विविध शाखांचे पदाधिकारी व प्रकोष्ठचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.पालघर जिल्ह्यात पहिल्या टप्यात पालघर,डहाणू व जव्हार या तीन नगरपरिषदा व वाडा नगर पंचायत,अशा चार ठिकाणी निवडणुका होत आहेत.एकूण १ लाख १६ हजार ६६० मतदार असून त्यापैकी ५९ हजार ७५६ पुरुष तर ५६ हजार ८७२ महिला मतदार आहेत.पालघर नगरपरिषद – ५५ हजार ७२७,डहाणू नगरपरिषद – ३८ हजार ६९३,जव्हार नगरपरिषद – ९ हजार ३४७ व वाडा नगर पंचायत – १२ हजार ८९३,असे एकूण १ लाख १६ हजार ६६० मतदार आहेत.विशेष म्हणजे डहाणू नगरपरिषद निवडणुकीत महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारापेक्षा अधिक आहे.येथे १९ हजार ६४५ महिला तर पुरुष मतदार १९ हजार १८ इतके आहेत.एकूण ५५ जागांसाठी या निवडणुका होत असुन पालघर – १५,डहाणू – १३,जव्हार -१०,व वाडा नगरपंचायत – १७,जागा आहेत.या निवडणुकीत भाजप व शिंदे गटाची युती झाल्यास महायुती विरुद्ध महाविकास आघाडी,अशी लढत होण्याची शक्यता आहे.भाजपने जर या निवडणुका स्वबळावर लढण्याचे ठरवले तर या चारही ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना ( शिंदे गट ) अशी सरळ लढत होईल.चार वर्षांपूर्वी एकसंघ शिवसेनेत फूट पडल्यानंतर जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे प्रचंड खच्चीकरण झाले.तर राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,या तीनही पक्षाचे जिल्ह्यात अस्तित्व नगण्य आहे.
तर बहुजन विकास आघाडीचा गेल्या विधानसभा निवडणुकीत वसई व नालासोपारा विधानसभा मतदारसंघात दारुण पराभव झाल्यानंतर अद्याप तो पक्ष स्वतःला सावरू शकलेला नाही.त्यांच्या पक्षातील एक मोठा गट नाराज असुन महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या की हा गट उचल खाण्याची शक्यता आहे. तसेच वसई व नालासोपारा वगळता या पक्षाची उर्वरित जिल्ह्यात बिलकुल ताकद नाही.वसई व नालासोपारा या दोन्ही विधानसभा मतदारसंघात त्यांच्या वर्चस्वाला भाजपने खिंडार पाडल्यानंतर हा पक्ष पुन्हा उभारी घेऊ शकला नाही. पक्षाच्या वरिष्ठानी पक्षाची सूत्रे पुन्हा स्वतःकडे घेतली तरच पक्ष फिनिक्स पक्षांप्रमाणे राखेतून भरारी घेऊ शकेल. जनमानसात प्रभाव नसलेल्याकडे पक्षाची धुरा सोपवणे,ही बाब आगामी निवडणुकीत अंगलट येणारी आहे.बहुजन विकास आघाडीने आगामी सर्व निवडणुकामध्ये फक्त वसई व नालासोपारा विधानसभा मतदारसंघावरच लक्ष केंद्रित करायला हवे.आजच्या घडीला पालघर जिल्ह्यात त्यांची डाळ शिजणार नाही.२ डिसें.रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या निकालाचे दुरगामी परिणाम होणार आहेत.या निवडणुकीत महायुतीने बाजी मारल्यास पालघर जिल्ह्याचे राजकीय चित्रच पार बदलले जाणार आहे.

