दिपक मोहिते,
” हल्लाबोल,” निवडणूक रणसंग्राम,
कोकणात राणे विरुद्ध राणे असा संघर्ष रंगणार,आणखी एक घराणं दुभंगण्याच्या वाटेवर,
राजकारणापायी आजवर अनेक घराणी दुभंगली.सत्तेच्या अमृताची गोडी फार काळ टिकत नाही,कालांतराने या अमृताचे विष होते व हे विष हळूहळू कुटुंबात पसरत जाते.राज्यात गेल्या पंधरा वर्षात अनेक कुटुंबे दुभंगली.पवार विरुद्ध पवार,मुंडे विरुद्ध मुंडे,ठाकरे विरुद्ध ठाकरे,हर्षवर्धन जाधव विरुद्ध त्यांची पत्नी संजना जाधव याव्यतिरिक्त अनेक कुटुंबाचा या यादीत समावेश आहे.आता नव्याने राणे विरुद्ध राणे असा संघर्ष कोकणात सुरू झाला आहे.
खा.नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश व नितेश,ही दोन्ही मुले गेली अनेक वर्षे कोकणच्या राजकारणात सक्रिय आहेत.पण या दोघांमधून विस्तव जात नाही.अखेर गेल्या विधानसभा निवडणुकीत या दोघांनी वेगवेगळ्या चुली मांडल्या आहेत.निलेश हे शिंदे गटात तर नितेश यांनी आपल्या पूर्वीच्या विचारसरणीला तिलांजली देत भाजपची वाट पकडली व त्यांना लगोलग मंत्रिपदाची लॉटरी लागली.अशाप्रकारे भाजपने कोकणात हिंदुत्वाचा एक प्रखर चेहरा समोर आणला.नितेश यांना मंत्रिपद मिळणे व त्यांची वाढती लोकप्रियता,अशा दोन कारणामुळे निलेश पूर्णपणे झाकोळले गेले व दोघांमधील मतभेद विकोपाला गेले.अधून मधून या दोघांमध्ये वाद होत होते.कोकणात भाजपचे वर्चस्व निर्माण करण्यात नितेश राणे यशस्वी झाले.कणकवली नगरपंचायत व मालवण नगरपरिषदेत गेल्या निवडणुकीत त्यांच्या स्वाभिमान संघटनेने बाजी मारली व त्यांच्या कारकिर्दीला सुगीचे दिवस आले
यंदा होऊ घातलेल्या आगामी निवडणुकीत नितेश राणे यांना रोखण्यासाठी निलेश राणे व अनेक विरोधक सरसावले आहेत.उद्योगमंत्री उदय सामंत,माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर,शिंदे गटाचे रामदास कदम,शिवसेनेचे ( उबाठा ) वैभव नाईक,भाजपचे संदेश पारकर हे सारे एकत्र आले आहेत.नितेश राणे यांची वाढती लोकप्रियता व वर्चस्व,हे भविष्यात आपल्याला डोकेदुखी ठरणार,अशी भिती या लोकांना वाटत असल्यामुळे येथे होणाऱ्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना ( शिंदे गट ) असा सामना रंगण्याची शक्यता आहे.मात्र या संघर्षामुळे आणखी एक कुटुंब मात्र कायमचे दुभंगणार आहे.

