दिपक मोहिते,
” हल्लाबोल,”
पुण्याचे राजकारण तापले,अजित पवार व मुरलीधर मोहोळ चांगलेच अडचणीत…
शिवसेनेचे ( शिंदे गट ) अनेक मंत्री व आमदारांची लक्तरे वेशीला टांगण्यात भाजपला यश आल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना महायुतीमधील अदृश्य शक्तीने,राष्ट्रवादी काँग्रेसला ( अजित पवार ) अडचणीत आणण्यास सुरुवात केली आहे.अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे आजवर अनेक प्रकरणी अडचणीत आले असून आता पुणे कोरेगाव पार्क उच्चभ्रू नागरी वसाहतीमधील सुमारे १८०० कोटी रु.ची जमीन ३०० कोटी रु.विकत घेतल्याचे प्रकरण शिवसेनेचे ( शिंदे गट ) अंबादास दानवे यांनी उघडकीस आणले. याप्रकरणाशी आपला दुरान्वये संबंध नसल्याचा दावा अजित पवार जरी करत असले तरी त्यांच्या या दाव्यावर शेंबडे पोर देखील विश्वास ठेवणार नाही.पुण्याचे खासदार व केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री यांचे जैन ट्रस्ट जमीन प्रकरण शिंदे गटाचे रविंद्र धंगेकर यांनी बाहेर काढल्यानंतर अजित पवार यांचे दिवटे चिरंजीव पार्थ पवार यांचे जमीन प्रकरण चव्हाट्यावर आले.या प्रकरणी अंबादास दानवे व शिंदे गटाचे रविंद्र धंगेकर यांना गोपनीय कागदपत्रे कोणी पुरवली ? हा खरा प्रश्न आहे.यामागे नक्की कोण आहेत ? याविषयी पुणे जिल्ह्यात सध्या खमंग चर्चा सुरू आहे.

महायुतीमधील तीन इंजिनचे सरकारच्या अनेक मंत्र्यांचे हात दररोज कोणत्या ना कोणत्या तरी प्रकरणात जात्याखाली येऊ लागले आहेत.पार्थ पवार प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही,हे प्रकरण माझ्या कानावर आले होते,पण,त्याच्याशी माझा कोणताही संबंध नाही,असा हास्यास्पद दावा काल अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला.आपला चिरंजीव काय लायकीचा आहे,त्यांनी आजवर केलेले अनेक उपद्व्याप गाठीशी असताना अजित पवार,हे महाराष्ट्राच्या जनतेला येडा ठरवू पाहत आहेत.दुसरीकडे शिंदे गटाचे रविंद्र धंगेकर हे भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्याला अडचणीत आणतात,यामागे कोण तरी बडा नेता असावा,अशी शंका राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.एकनाथ शिंदे यांना अंधारात ठेवून रविंद्र धंगेकर,हे धाडस करतील,हे शक्यच होऊ शकत नाही.मुरलीधर मोहोळ,हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.पुण्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून अजित पवार,चंद्रकांतदादा पाटील व मुरलीधर मोहोळ,या तिघा दिग्गज नेत्यांत वर्चस्ववादाची लढाई सुरू आहे.पार्थ पवार व मुरलीधर मोहोळ यांना लक्ष्य करण्यामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत,अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही महिन्यांपासून शिंदे यांच्यामागे गणेश नाईक नावाचे पिल्लू सोडून दिले आहे.या नाईक यांनी ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांना सळो की पळो करून सोडले आहे.त्यामुळे एकनाथ शिंदे देखील बुद्धिबळाच्या पटावर आता तिरकी चाल खेळू लागले आहेत.पार्थ पवार व मुरलीधर मोहोळ या दोघांना टार्गेट करत त्यांनीही फडणवीस व अजित पवार यांना सध्या अडचणीत आणले आहे.या सर्व घडामोडी लक्षात घेता,महायुतीमधील हे तीन घटक पक्ष,पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकोप्याने लढतील,असे वाटत नाही,आणि भाजपला नेमके तेच हवं आहे.

