दिपक मोहिते,
” हल्लाबोल,” ” निवडणूक रणसंग्राम, ”
पालघर नगरपरिषद निवडणूक ; भाजप वेगळी चूल मांडणार..
पालघर नगरपरिषदेची आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे.येथे शिवसेना ( शिंदे गट ) व भाजप या महायुतीच्या प्रमुख घटक पक्षाचे नाते विळ्या – भोपळ्याचे असून पालघरच्या ग्रामीण भागातील दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकमेकांना कायम पाण्यात बघत असतात.गेल्या महिन्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी शिंदे गटाचे सुमारे हजारभर कार्यकर्ते फोडल्यामुळे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या अशा फोडाफोडीच्या राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली व आम्हीही हा गलिच्छ प्रकार करू शकतो.त्यामुळे भाजपने महायुतीचा धर्म पाळावा,असा इशारा दिला आहे.
भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गटाची साथसंगत नकोशी झाली आहे.पालकमंत्री गणेश नाईक व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमधून विस्तव जात नाही,हे सर्वश्रुत आहे.पालघर जिल्ह्यात शिंदे गटाचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक सत्तेत आल्यापासून चांगलेच सक्रिय झाले आहेत.शिंदे व नाईक यांच्यामध्ये असलेले राजकीय शत्रुत्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गणेश नाईक यांना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देऊ केले आहे.त्याचा पुरेपूर वापर करत नाईक यांनी जिल्ह्यात शिंदे गटाची चांगलीच कोंडी केल्याचे पाहायला मिळत आहे.सध्या पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची तुरळक उपस्थिती असते.
गेल्या महिन्यात भाजपने शिंदे गटाचा मोहरा ( कैलाश म्हात्रे ) गळाला लावल्यामुळे शिंदे गटात प्रचंड चलबिचल निर्माण झाली आहे.या सर्व पार्श्वभूमीवर या निवडणुका होत असल्यामुळे भाजप चांगलाच सक्रिय झाला आहे.पालघर नगरपरिषदेतील गेल्या पाच वर्षातील भ्रष्ट व अनागोंदी कारभारामुळे करदाते हे शिंदे गटावर प्रचंड नाराज आहेत,त्याचा फटका आपल्याला बसू शकतो,अशा भितीमुळे भाजप या निवडणुकीत आपली वेगळी चूल मांडण्याच्या प्रयत्नात आहे.जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही भाजप ” एकला चलो रे,” च्या भूमिकेत असेल,असे वाटते.
या नगरपरिषदेची स्थापना होऊन २६ वर्षे झाली,पण शहर अद्याप बाळसं धरू शकले नाही.रस्ते,आरोग्य व अन्य नागरी सोयी – सुविधांचे प्रश्न आजही जैसे थे स्थितीतच आहेत.गेली अनेक वर्षे या नगरपरिषदेत भ्रष्टाचाराचे थैमान सुरू असून कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही.त्यामुळे भाजप शिंदे गटाला सोबत घेऊन या निवडणुका लढवेल,अशी सुतराम शक्यता नाही.

