दीपक मोहिते,
भाजपची वाटचाल कोणत्या दिशेने ?
” हल्लाबोल,”
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नाशिक येथे झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात जे वक्तव्य केले,त्यावरून भविष्यात भाजपची वाटचाल कशी असेल,हे स्पष्ट होत आहे.

नाशिक येथे झालेल्या भाजपा कार्यकर्ता संवाद मेळाव्यात चव्हाण,आपल्या भाषणात म्हणाले,” एक विचाराचं सरकार केंद्र,राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणणे गरजेचे आहे.कारण,एक विचारांच सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असेल तर केंद्र व राज्याकडून येणारा विकास निधी योग्य लोकांच्या हाती जाऊन त्याचा सदुपयोग होईल.”
वरकरणी,त्यांचे हे वाक्य साधं व विकासासंदर्भात असावे,असे वाटत असले तरी,या वाक्यामध्ये वेगळेपण दडले आहे.केंद्र सरकारची वाटचाल जी एकधिकारशाहीच्या दिशेने सुरू झाली आहे,त्याला अनुसरून चव्हाण यांनी हे वक्तव्य केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ” एक देश,एक निवडणूक,या संकल्पनेला बळ देणारे हे वाक्य आहे.खालपासून वरपर्यंत एकाच पक्षाचे सरकार असायला हवे,असे त्यांना अपेक्षित आहे.लोकशाही व्यवस्थेची जी चौकट आपण आठ दशकांपूर्वी स्विकारली आहे,ती मोडकळीत काढण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे.भाजपला देशात अमेरिकेच्या धर्तीवर अध्यक्षीय राजपद्धती आणायची आहे.चव्हाण जे काही बोलत आहेत,त्यामागे वेगळाच उद्देश असल्याचे जाणवते.निधीचा सदुपयोग होईल,असे जे ते म्हणत आहेत,त्याला संविधानिक आधार नाही.विद्यमान स्थितीत ते शक्य देखील नाही,कारण सरकारचे अस्तित्व,हे मतदारांवर अवलंबून असते.केंद्र,राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकाच पक्षाचे सरकार असणे,हे धोकादायक आहेच,पण ते आपल्या लोकशाही प्रणालीमध्ये कदापी शक्य नाही.

