दिपक मोहिते,
” दारुण वास्तव,”
सरकार व विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहेत,
आपले मायबाप सरकार व धनदांडगे,ग्रामीण भागातील आपल्या अन्नदात्यांची कशी क्रूर चेष्टा करत असतात,हे पालघर जिल्ह्यात नुकतेच अनुभवायला मिळाले.नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसात वाडा तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या ७ एकर शेतातील भाताचे पीक आडवे झाले.उद्दीग्न अवस्थेत सापडलेल्या या शेतकऱ्याने विमा कंपनीकडे नियमानुसार नुकसानभरपाईची मागणी केली.या मागणीनुसार पंचनामा करण्यात आला व बाधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात विमा कंपनीने झालेल्या नुकसानापोटी २ रु.३० पैसे जमा केले.

सदर बातमी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली व शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली.सरकार व खाजगी विमा कंपन्या आम्हा शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करतात,अशी भावना येथील शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे.या अशा घटना राज्याच्या अनेक भागात घडल्या असून सरकार त्याकडे उघड्या डोळ्याने बघण्याशिवाय काही करू इच्छित नाही.राज्यात कृषी व शिक्षण,हे दोन्ही विभाग आपल्या गलथान कारभारामुळे बदनाम झाले आहेत.या दोन्ही विभागाच्या अशा कारभारामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांचे गेल्या पाच वर्षात अतोनात नुकसान झाले व आजही होतच आहे.अवकाळी पावसामुळे राज्यातील कृषी क्षेत्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.भात, सोयाबीन,मका व अन्य कृषी मालाचे ” होत्याचे नव्हते, ” झाले आहे.शेतकरी आपल्या उत्पादित मालावर सध्या ट्रॅक्टर फिरवत आहेत,पण आपले सरकार या अस्मानी संकटाकडे ढुंकून बघायला तयार नाही.या सरकारने खाजगी विमा कंपन्यांना मुक्तहस्ते परवाने दिले,पण त्यांच्या कारभारावर अंकुश ठेवला नाही,त्यामुळे या विमा कंपन्यांनी कृषी क्षेत्रात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.शेतकऱ्यांच्या उत्पादित कृषीमालाला ” सुरक्षा कवच,” या गोंडस नावाखाली सरकारने खाजगी विमा कंपन्यांना सरसकट परवाने दिले,पण या कंपन्यांनी मात्र शेतकऱ्यांची अक्षरशः लूट केली.विमा कंपन्यांच्या या अशा लुटीच्या कारभारामुळे राज्यात आजवर लाखो शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले,त्यांची कुटुंबे देशोधडीला लागली,पण सरकार मात्र या ज्वलंत विषयी कोणतीही उपाययोजना करत नाही.त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

