दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
राज्यकर्त्यांच्या नालायकपणामुळे एसटी सेवा मृत्युशय्येवर…
ग्रामीण भागाची जीवन वाहिनी,अशी ओळख असलेली आपली जिवाभावाची एसटी सेवा आता शेवटचे आचके देऊ लागली आहे.मृत्यूशय्येवर निपचित अवस्थेत पडलेल्या या सेवेला प्राणवायू मिळण्याची शक्यता आता धूसर बनत चालली आहे.आपल्या राज्यकर्त्यांच्या नालायकपणामुळे चांगल्या सेवेची पार दुर्दशा झाली आहे.ग्रामीण भागातील जनता आजही या सेवेतील लालपरीला जीव लावत आहेत.तर दुसरीकडे आपले नालायक राज्यकर्ते या सेवेची तिरडी बांधू पाहत आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी सेवा ही एकेकाळी देशभरात नावारूपाला आलेली सेवा म्हणून ओळखली जात असे.आज त्या सेवेची अवस्था ” पाहवत नाही,आणि सहनही होत नाही,” अशी झाली आहे.नोकरशाही व रा
ज्यकर्ते या दोघांनी या सेवेचे अक्षरशः लचके तोडले.साहित्य खरेदी,वाहन दुरुस्ती व देखभाल,या क्षेत्रातील बजबजपुरी आणि आता मोक्याच्या ठिकाणी असलेल्या महामंडळाच्या मौल्यवान जमीनविक्री इ.गैरप्रकारामुळे महामंडळाची आर्थिक स्थिती सध्या पार डबघाईला आली आहे.ज्या वाहनाचे आयुष्य संपले आहे,ती वाहने अद्याप रस्त्यावर धावत आहेत.नवीन वाहने खरेदी करण्याच्या व्यवहारातही आपले राज्यकर्ते हात धुवून घेत आहेत.

या राज्यकर्त्यांच्या दारात कोट्यवधी रु.किमतीच्या टेस्ला गाड्या उभ्या राहू लागल्या आहेत.तर दुसरीकडे ग्रामीण भागातील गोरगरीब जनता आपला जीव मुठीत धरून तुटलेले दरवाजे व खिडक्यांच्या वाहनातून प्रवास करत असतात.एकेकाळी नावारूपाला आलेली ही सेवा सध्या आर्थिक खाईत सापडली आहे.कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन नाही,साहित्य खरेदीसाठी पैसा नाही,प्रवासी पळवणे,( खाजगी वाहने आगारात शिरून प्रवासी पळवतात ) अशा सर्व गैरप्रकारामुळे ही सेवा येणाऱ्या काळात इतिहासजमा झाल्यास आपण आश्चर्य वाटून घेता कामा नये.

