दीपक मोहिते,
” जय्यत तयारी,”
महाविकास आघाडीमध्ये सामील होणे ; बविआचा कपाळमोक्ष होऊ शकतो,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका,या बिहार राज्य विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर कोणत्याही क्षणी जाहीर होतील,अशी शक्यता गृहीत धरून भाजप व बहुजन विकास आघाडी या दोघांनी जोरदार तयारी चालवली आहे.गेल्या काही दिवसात भाजपने पक्षाच्या विविध विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचा सपाटा लावला आहे.तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीने विभागवार कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचा धुरळा उडवून दिला आहे.
मात्र या सर्व प्रक्रियेत मतदारांच्या मनात नेमके काय आहे ? याविषयी अनेक राजकीय पक्ष सध्या संभ्रमावस्थेत आहेत.या निवडणुकीत जो पक्ष आपल्या पक्षाच्या प्रचाराचा भर ” परिसर विकास,” या ज्वलंत विषयावर राबवेल,मतदार त्यालाच डोक्यावर घेतील,असा अंदाज आहे.या निवडणुकीत मतदारांची समाजरचना अत्यंत महत्वाची आहे.हे दोन्ही पक्ष वगळता इतर पक्षात मात्र स्मशान शांतता असल्याचे पाहायला मिळत आहे.त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय कांग्रेस,दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व दोन्ही शिवसेना,या पाच राजकीय पक्षाचा समावेश आहे.महाविकास आघाडी व बहुजन विकास आघाडी ही निवडणूक एकजुटीने लढतील,अशी चर्चा होत असली तरी अशाप्रकारची आघाडी बहुजन विकास आघाडीला त्रासदायक ठरू शकते.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील एक गट ” बविआसोबत साथसंगत नको,” असा सूर आळवत आहे.महाविकास आघाडीत मनसेला सामील करून घेणे,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला परवडणारे नाही.मुस्लिम,गुजराथी व उत्तर भारतीय मतदार आपल्यापासून दुरावतील अशी भिती काँग्रेसजनांना वाटत आहे,आणि ही भिती रास्तच आहे.
उत्तर भारतीय लोकाबाबत मनसेची भूमिका,हिंदीच्या सक्तीबाबत त्यांचे कडवट धोरण,कबूतरखाना बंदी व अन्य भाषिकांवर मराठी भाषेत बोलण्याची त्यांच्याकडून होणारी सक्ती इ.कारणामुळे गुजराती व अन्य समाज या निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ देईल,असे वाटत नाही.अशा परिस्थितीत बविआने त्यांच्यासोबत हातमिळवणी केली तर ते भाजपच्या पथ्यावर पडणारे आहे आणि त्याचा जबर फटका बविआला बसू शकतो.
गेल्या काही दिवसात भाजपने या निवडणुकीसाठी नियोजनबद्ध आखणी केल्याचे दिसून येत आहे.त्यांनी उत्तर भारतीय आघाडी,उद्योग,कामगार,
सहकार,सोशल मीडिया,आयटी सेल,शिक्षक,जैन प्रकोष्ठ,सांस्कृतिक,
राजस्थान प्रकोष्ठ,पंचायतराज,
ग्रामविकास,कायदा सेल,दक्षिण भारतीय प्रकोष्ठ,पदवीधर सेल,भटके विमुक्त आघाडी,क्रीडा प्रकोष्ठ व बेटी बचाव,बेटी पढाव सेल,या विभागाचे अध्यक्ष व किमान पंधरा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.या सेलमधील प्रत्येक पदाधिकाऱ्यांवर महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
या निवडणुकीत भाजप जागावाटपात शिंदे गटाला हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच जागा देईल,त्यांना त्या मान्य न झाल्यास आपण या निवडणुका स्वबळावर लढू,असे सांगत भाजप शिंदे गटाचे खच्चीकरण करण्याची शक्यता आहे.हे असे घडू शकते,याची शिंदे गटाला देखील कल्पना असल्यामुळे शिंदे गट सध्या विमनस्क अवस्थेत सापडला आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विजय पाटील यांना चांगली मते मिळाली होती.ख्रिस्ती समाज हा भाजप व शिवसेनेला कधीही मतदान करत नाही,त्यामुळे त्यांनी एकगठ्ठा मते विजय पाटील यांच्या पारड्यात टाकली होती.या निवडणुकीत काँग्रेस जर मनसेसोबत मांडीला मांडी लावून बसली तर विधानसभा निवडणूकीसारखी पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाही.बविआने महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याचा जो निर्णय घेतला आहे,तो त्यांचा कपाळमोक्ष करणारा आहे.आघाडीत मनसेला स्थान मिळाल्यास अन्य भाषिक समाज बविआपासून दुरावण्याची शक्यता आहे.

