दीपक मोहिते,
ऋतुचक्र विस्कळीत होणे,अत्यंत धोकादायक,
निसर्गाने उधळण केलेल्या संपूर्ण रचनेत हवा,पाणी,जमीन,वनस्पती,पशु,पक्षी,
कीटक व माणूस या सर्वांचा समावेश मिळून पर्यावरण तयार होत असते.त्याचे प्रमाण व रचना,ही आपापल्या गरजेनुसार करण्यात आली आहे.हे सर्व घटक एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे त्याचा एकत्रितपणे विचार करण्याची आवश्यकता असते.पूर्वी काळी तो विचार केला जात होता,परंतु जसजशी लोकसंख्या वाढत गेली निसर्गाचे हे चक्र विस्कळीत होत गेले.त्यामुळे आज तुम्हा-आम्हा सर्वाना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहेत.यूरोप खंडातील अनेक शहरे आज अधुन मधून निसर्गाच्या तडाख्यात सापडलेली आपण पाहतो.आधुनिक पद्धतीची शहरे वसली,परंतु ही शहरे वसवताना पर्यावरणावर त्याचा काय परिणाम झाला ? याचा आपण कधीच विचार केला नाही.त्याचे परिणाम सध्या आपल्याला भोगावे लागत आहेत.नदी नाले यांची मुखपात्रे वळवणे,सागरी नियंत्रण कायद्याचे उल्लंघन,तिवराच्या झाडाची कत्तल,पाणथळ जमिनीवरील बांधकामे,खाड़ीपात्रात मातीभराव करून बांधकामे उभारणे,दगडखाणीमधून निर्माण होणारे धुळीचे साम्राज्य,
नद्या-खाड्यातील यांत्रिक पद्धतीने होणारे रेतीउत्खनन इ.गैरप्रकारामुळे पर्यावरणाचे संतुलन विस्कळीत होत असते व ते विस्कळीत झाले कि निसर्गाचा कोप आपण ओढवून घेत असतो.त्सुनामी हा त्यामधील एक प्रकार आहे.

हवेत मानवी जीवनाला आवश्यक असणाऱ्या प्राणवायुसोबत नायट्रोजन,कार्बन डायऑक्साईड,हिलीयम,निऑन,
हायड्रोजन,ओझोन,धुलीकण व बाष्प,अशा विविध घटकांचा समावेश असतो.त्याचे विशिष्ट प्रमाण निसर्गचक्राला संतुलित ठेवण्याचे महत्वाचे काम करत असते.या घटकाच्या प्रमाणात बदल झाल्यास पृथ्वीवरील जीवसृष्टी धोक्यात येते.

मानवी जीवनाला सर्वात मोठा धोका हा वृक्षतोड़ीपासून असतो.वनस्पती कार्बन डायऑक्साईड शोषुन घेवून प्राणवायु सोडत असतात.त्यामुळे वृक्ष तोड़ीमुळे कार्बन डायऑक्साईडचे हवेतील प्रमाण वाढत जाते.हवेतील प्राणवायुचे प्रमाण कमी व कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण अधिक,अशामुळे पृथ्वीचे तापमान सतत वाढत चालले आहे.
ही स्थिती अत्यंत धोकादायक असून मानवाने वेळीच सावध न झाल्यास येणारा काळ अत्यंत कठीण आहे.या गंभीर विषयी केंद्र व राज्य सरकारचे पर्यावरण मंत्रालय संवेदनशील नाही. अनेक विनाशकारी प्रकल्प आपल्या राज्यात होऊ घातले आहेत.त्यासाठी केंद्र व राज्य सरकार संबंधित उद्योगाना वृक्षतोडीसाठी वारेमाप परवानग्या देत सुटले आहे.वाढवण बंदर,मेट्रो कारशेड,समृद्धी मार्ग,बुलेट ट्रेन व द्रूतगती महामार्ग ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. सरकारचे पर्यावरण विषयक धोरण हे मानवजातीला विनाशाच्या खाईत ढकलणारे आहे.पण आपले सरकार धनधांडग्या उद्योगपतीच्या फायद्यासाठी देशाला विनाशाच्या वाटेवर नेत आहे.

