दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
आघाडी व युतीच्या माध्यमातून निवडणुका लढवणे,हे दिवास्वप्नच असेल,
महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वसई तालुका हा दिवसेंदिवस संवेदनशील बनत चालला आहे.कोणताही विषय असो,भाजप व बहुजन विकास आघाडी एकमेकांच्या नाकदुऱ्या काढण्यात आघाडीवर आहेत.गेल्या तीस वर्षात वसईकर नागरिकांना अशी स्थिती कधीच पाहायला मिळाली नाही.त्यामुळे आगामी निवडणुकीत निवडणूक आयोग,महानगरपालिका व पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण येण्याची शक्यता आहे.निवडणुकीच्या प्रचारावर पोलिसांना यंदा करडी नजर ठेवावी लागणार आहे.
विधानसभा काबीज केल्यानंतर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीने देखील भाजपला रोखण्यासाठी कंबर कसली आहे.या दोघांच्या जीवघेण्या स्पर्धेत शिवसेना ( उबाठा ), शिवसेना ( शिंदे गट ),भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,मनसे व दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस,हे सहाही पक्ष पार झाकोळले गेले आहेत.शिवसेना ( उबाठा ) व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे दोन पक्ष वगळता वसई तालुक्यात इतर पक्षाचे अस्तित्व नाममात्र आहे बहुजन विकास आघाडी,शिवसेना ( उबाठा ) मनसे,राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) हे महाविकास आघाडीच्या तर भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) हे महायुतीच्या माध्यमातून एकमेकांशी लढतील,अशी शक्यता आहे.या निवडणुकीत अशी लढत झाल्यास महाविकास आघाडी व महायुती या दोघांसमोर जागावाटपाचा तिढा निर्माण होऊ शकतो.बहुजन विकास आघाडी व भाजप या दोघांचे प्राबल्य लक्षात घेता हे दोन्ही पक्ष आपल्या मित्रपक्षांना फारशा जागा देतील,असे वाटत नाही.त्यामुळे जागावाटपाच्या वेळी आघाडी व युती तुटण्याची दाट शक्यता आहे.उद्धव व राज या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे दोघांच्या सैनिकात सध्या उत्साहाचे वातावरण आहे.त्यामुळे हे दोघेही जास्त जागांवर दावा करण्याची शक्यता आहे.त्याचा फटका बहुजन विकास आघाडीला बसू शकतो.त्यामुळे बहुजन विकास आघाडी या दोन्ही पक्षांकडून जर अवास्तव मागणी आल्यास बहुजन विकास आघाडी त्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावेल,तर दुसरीकडे शिंदे गटाची वसई तालुक्यात असलेली नाममात्र ताकद पाहून भाजप त्यांना हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच जागा देण्याची तयारी दाखवेल.ते मान्य न झाल्यास हे दोघेही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतील.महाविकास आघाडीत जर मनसेला सहभागी करून घेतल्यास त्याचा फटका बविआ व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला बसू शकतो,त्यामुळे त्या पक्षाचे नेते सध्या ” वेट अँड वॉच,” च्या भूमिकेत आहेत.जर महाविकास आघाडीमध्ये मनसेचा समावेश झाला तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आपली वेगळी चूल मांडेल व मुस्लिम,उत्तर भारतीय,ख्रिस्ती मतदार हे काँग्रेस पक्षाकडे वळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

