दीपक मोहिते,
वेळीच सावध व्हा,अन्यथा मानवजातीचा विनाश अटळ,
राज्यात यंदा पाऊस मुबलक प्रमाणात झाला असून पिण्याचे,शेतीसिंचन व उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे पाणी,किमान ७ महिने पुरेल इतका जलसाठा राज्यात उपलब्ध झाला आहे.काही ठराविक जिल्ह्यात ” नेमेची येतो पावसाळा,” या म्हणीनुसार यंदा ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.आपले सारे जीवन हे पावसाळी पाणी व भूगर्भातील जलसाठा,यावर अवलंबून आहे.पाव
साचे प्रमाण सतत कमी होणे व भूगर्भातील पाण्याची पातळीमध्ये सतत होणारी घसरण,इ.कारणांमुळे जगभरातील अनेक देश सध्या चिंतेत सापडले आहेत.येणाऱ्या काळात पाण्याचा प्रश्न अक्राळ विक्राळ रूप धारण करेल व परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाईल.आज देशभरातील अनेक देश पाणीटंचाईत होरपळत आहेत.आफ्रिका खंडातील काही देश पाण्यावाचून तडफडत आहेत.वाढती लोकसंख्या व पाण्याची उपलब्धता,याविषयीचे गणित बिघडल्यामुळे अनेक देशात हाहाकार उडाला आहे.

पर्यावरण संतुलन जपण्याकडे जगातील सर्वच देशांनी दुर्लक्ष केल्यामुळे येत्या २५ वर्षात जगावर जलसंकट ओढवणार आहे.पण मानवजात आपल्या वागण्यात बदल करू पाहत नाही.आपल्या देशात १९८० पासून तापमानात प्रचंड वाढ होऊ लागली.पर्यावरण संतुलनाचे चक्र उलट्या दिशेने तेही प्रचंड वेगाने फिरू लागले व त्याचे परिणाम अल्पावधीत आपल्याला जाणवू लागले आहेत.तरीही आपण,आपल्या वागण्यात बदल करू पाहत नाही.पाण्याच्या मागणीत झालेली प्रचंड वाढ,बेभरवशाचे पर्जन्यमान,वाढते नागरीकरण,त्या अनुषंगाने लोकसंख्येत झालेली वाढ व ओरबाडून खाणारी मानवाची स्वार्थी वृत्ती,अशा विविध कारणांमुळे जलसंकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे.
केंद्रीय भूजल मंडळाने मध्यंतरी केलेल्या संसाधन मूल्यमापनानुसार भूजल उपशामध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे नाले,तलाव,विहिरी व जलाशये,असे अनेक जलस्रोत राज्यांत आटत चालले आहेत.तसेच ज्या भागात पाण्याची धरणे बांधण्यात आली आहेत,त्या परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी,प्रचंड खालावली आहे.आपल्या राज्यातील २३ जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार गावात विहीरी व बोअर खणण्यावर अनेक बंधने घालण्यात आली आहेत.पण ही बंधने न जुमानता,ग्रामस्थ ” आपले तेच खरं,” अशा पद्धतीने वागत आहेत.कोकण परिसरात भूगर्भात पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात आहे,पण आता पर्यटनाच्या नावाखाली येथेही प्रचंड उपसा सुरू झाला आहे.पाणलोट क्षेत्र विकास म्हणजे वाहून जाणारे पाणी अडवणे व ते जमिनीत मुरवणे,त्यासाठी वनीकरण,वृक्षलागवड व डोंगर माळरानाचा विकास करणे होय.

पण अशाप्रकारची दीर्घकालीन कामे सध्या हाती घेतली जात नाहीत.त्याऐवजी भूगर्भातील पाण्याचा उपसा मात्र मोठ्याप्रमाणात होत आहे.त्यामुळे कोकणचा ” कॅलिफोर्निया,” करण्याचे स्वप्न,हे केवळ दिवास्वप्नच राहणार आहे,ते प्रत्यक्षात उतरेल,अशी सुतराम शक्यता नाही.मध्यंतरी लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन शक्य आहे,असा विचार पुढे आला.पण सरकारी यंत्रणेतील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार व लोकांची उदासीनता,अशा दोन कारणामुळे त्या योजनेचा बट्ट्याबोळ झाला.हिवरेबाजार या गावातील ग्रामस्थांना जलसंधारण व जलसंचय,या दोन योजनेचे महत्व कळू शकले,पण इतरांनी त्याचे महत्व जाणले नाही.शहरी भागात ” रेन वॉटर हार्वेस्टिंग,” योजना,सरकारने बंधनकारक केली आहे.पण ते पाळते कोण ? ही योजना प्रभावीपणे राबवली असती तर शहरी भागातील पाणीटंचाईची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊन ” टँकर्सचे पाणी,” हे आरोग्याला धोकादायक असलेल्या पाण्याचा वापर नक्किच टळू शकला असता.पण शहरी भागातील सुशिक्षित नागरिकांना तेही मान्य नाही.
भविष्यात निर्माण होणाऱ्या जलसंकटाला सामोरे जाण्यासाठी जगातील देश विविध स्तरावर प्रयत्नशील आहेत.पण गेल्या चाळीस वर्षात फारसे यश मिळू शकले नाही.सध्याच्या घडीला जगातील १० पैकी ३ व्यक्ती पाण्यासाठी तहानलेला आहे.आज आपल्या देशात १९ कोटी लोकांना पिण्याचे साधे पाणी मिळत नाही,त्यासाठी केंद्र सरकारने ” जलशक्ती मिशन,” योजना आखली आहे.येत्या २०२५ पर्यंत १९ कोटी लोकांच्या घरात नळाचे पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट सरकारने राखले आहे.पण हे उद्दिष्ट साध्य होऊ शकले नाही.या योजनेवर केंद्र सरकारने कोट्यवधी रु.ची आर्थिक तरतूद केली व खर्चही करण्यात आला, दुर्देवाने तो कारणी लागू शकला नाही.केंद्र सरकारने सर्वप्रथम जलसंवर्धन व जलनियोजन,या दोन महत्वाच्या बाबीवर लक्ष केंद्रित करायला हवे.कारण या योजनेसाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी भूगर्भातील पाण्याचा उपसा थांबवणे व पर्जन्यमानाचे प्रमाण वाढवणे,यावर प्रभावीपणे काम करणे गरजेचे आहे.गावागावातील पाणवठे अबाधित राहणे व गाळाने भरलेले तलाव साफ करणे,जुने जलस्रोत सुरक्षित राखणे इ.कामे गावकऱ्यांनी करायला हवीत.ही सारी कामे करण्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे.पण ग्रामीण भागातील जनता देखील अशा गंभीर प्रश्नी संवेदनशील नाही.वृक्षलागवड,कुरण विकास व जैविक बांधापासून वनराई बंधाऱ्यापर्यंत इ.उपायांनी जमिनीवरील व भूगर्भातील पाण्याची पातळी आपण उंचावू शकतो.पण आपण त्यादृष्टीने प्रयत्न करण्यास तयार नाही.भूजलाचा वापर करताना तो ऊस,भात व बागायती उत्पन्नाना किती प्रमाणात लागतो,यांचे नियोजन असावे लागते.ते नियोजन आपल्याकडे नाही.त्यामुळे आवश्यकतेपेक्षा भूगर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा होत असतो आणि ते पाणी मग वाया जाते.जमिनीवर पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब वाया न जाऊ देणे,तो जमिनीत जिरवणे आवश्यक आहे.भूगर्भातील पाण्याचा वापर करण्याचा जसा अधिकार आपल्याला आहे,तसेच जलपुनर्भरण करणे,ही आपली नैतिक जबाबदारी आहे.भूगर्भात पाणी साठले तरच पाणीउपसा करण्याचा अधिकार आपल्याला आहे,हे आपण सोयीस्कररित्या विसरतो.पर्यावरण संतुलन सांभाळ करणे,हा महत्वाचा असा विषय असून त्याचा पर्जन्यमान व भूगर्भातील पाण्याशी अगदी निकटचा संबंध आहे.यामध्ये वृक्षलागवडीला अनन्यसाधारण महत्व आहे.ते ओळखून काही वर्षापूर्वी सरकारने सामाजिक वनिकरण योजना सुरू केली.या योजनेंतर्गत गावागावात वृक्षलागवड मोहिमा हाती घेण्यात आल्या.या मोहिमेंतर्गत किती झाडे लावण्यात आली ? हा एक वेगळा विषय आहे.डोंगर व जंगलात लावण्यात येणाऱ्या झाडांची मुळॆ जमिनीतील पाणी घट्ट पकडून ठेवतात,त्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या साठ्यात पाणी साचून राहते. जंगलातील,तलाव,नाले,
यामध्ये बारमाही पाणी उपलब्ध होत असते.जंगलातील जनावरे याच पाण्यावर आपली तहान भागवत असतात.परंतु गेल्या काही वर्षात जंगलातील जलसाठेही प्रचंड वृक्षतोडीमुळे संपूष्टात आले आणि बिबट्यासारखी हिंस्त्र जनावरे पाण्याच्या शोधात नागरी वसाहतीमध्ये शिरू लागली.
पर्जन्यमानाचे प्रमाण सतत कमी होणे व भूगर्भातील जलसाठे संपुष्टात येणे,या दोन्ही बाबीचा मानवी जीवनावर प्रतिकूल परिणाम होणार आहेत.त्यामुळेच अनेक जलतज्ञानी,भविष्यात जर तिसरे महायुद्ध झाले तर ते पाण्यावर होईल,असा इशारा दिला आहे.त्यांच्या या इशाऱ्यात तथ्य आहे.त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही,मानवाने हा गंभीर धोका ओळखून वेळीच आपल्या स्वार्थास मूठमाती द्यावी,अन्यथा तुमचा-आमचा सर्वांचा विनाश अटळ आहे.

