दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
राज्यात सौहार्दाचे वातावरण बिघडत चालले आहे,
राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावरून ओबीसी व मराठा,या दोन समाजात जे काही रणकंदन माजले आहे,त्यास शरद पवार व देवेंद्र फडणवीस या दोघांचे गलिच्छ राजकारण कारणीभूत ठरले आहे.राज्यातील या दोन प्रमुख समाजाला एकमेकाविरोधात उभे करण्याचे पाप या दोघांनी केले आहे.त्यामुळे एरव्ही शांत असलेले हे दोन्ही समाज आता एकमेकांच्या उरावर बसू लागले आहेत.समाज विस्कळीत करण्याचे पाप या दोघांकडून झाल्याचे अनेक पुरावे हाती आले आहेत.

१९९४ साली राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असलेल्या शरद पवार यांनी
काढलेल्या एका जीआर मुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला.त्यावेळी शरद पवार यांनी मराठा आरक्षण कायद्याने शक्य नाही,असे वारंवार सांगत असत,आज तेच पवार,आरक्षण मिळाले पाहिजे,म्हणून जरांगे पाटलांना बळ देत आहेत.ज्यावेळी ते सत्तेत होते,तेव्हा ते अशाप्रकारचे आरक्षण देणे,शक्य नाही, असे तुणतुणे वाजवत होते.आज मात्र मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे,असा आग्रह धरत आहेत.जरांगे पाटील हे पवारांवर कितीही टीका करत असले तरी त्यांना पवार यांच्याकडून बऱ्यापैकी रसद पुरवण्यात येत होती,हे आता लपून राहिलेले नाही.दुसरीकडे राज्यात ओबीसी समाजाचे प्राबल्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी. या समाजाच्या नेत्यांना फूस लावण्याचे धोरण अवलंबले.ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांना त्यांनी या प्रश्नी हाताशी धरले असून भुजबळ यांनी सध्या राज्यभरात रान उठवण्यास सुरुवात केली

आहे.मंत्रिमंडळात राहून वादग्रस्त विषयावर तसेच मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाविरोधात भूमिका घेणे,चुकीचे असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही.शिंदे व फडणवीस यांच्यातील जीवघेण्या राजकारणात या दोन्ही समाजाचे लोक भरडले जात आहेत.समाज दुभंगण्याचे काम मंत्रिमंडळात असलेल्या ज्येष्ठ मंत्र्यांकडून होते व सरकार त्यांच्या या कृतीकडे डोळेझाक करते,हे भारतीय संविधानाचा अवमान करण्यासारखे आहे.मराठा व ओबीसी समाजाच्या मतपेटीवर डोळा ठेवून हे सारे उपद्व्याप करण्यात येत आहेत.पण हे उपद्व्याप आपल्या व्यवस्थेला किती हानिकारक आहेत,यांची त्यांना जाणीव नाही,त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात सामाजिक सलोखा टिकून राहणे,कठीण होणार आहे.


