दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
कोविड १९ पेक्षा ” इनकमिंग,” या व्हायरसचा वेगाने फैलाव,
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर ” इनकमिंग,” या व्हायरसचा फैलाव मोठ्या वेगाने सुरू झाला आहे.जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे तरी या व्हायरसने बाधित झालेले रुग्ण आढळत आहेत.हा व्हायरस,कोविड १९ च्या व्हायरसपेक्षा अत्यंत धोकादायक असून तो तुमच्या मुलाबाळांचे भवितव्य उध्वस्त करणारा आहे.दिवसागणिक पसरत चाललेल्या व्हायरसला रोखणारी लस देखील भविष्यात सापडू शकणार नाही.कोविड १९ चा आपण नायनाट करू शकलो,पण हा व्हायरस संपूर्ण तरुण पिढीला गिळंकृत करणारा आहे.हा व्हायरस हा तुमच्या सदसदविवेकबुद्धीवर हल्ले करतो.तुमची विचारसरणी कुंठित करतो,त्यामुळे हा व्हायरस,कोविड १९ पेक्षा अत्यंत घातक असा आहे.
असो,गेल्या काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांनी भाजपच्या पावलावर पाऊल ठेवत फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे.पूर्वीच्या काळी प्रत्येक राजकीय पक्षाची विशिष्ट अशी आयडॉलॉजी असायची,त्यानुसार पक्षाचे खासदार,आमदार,
नगरसेवक,पदाधिकारी व कार्यकर्ते वागत असत.पण २०१४ साली भाजपचे सरकार केंद्रात स्थानापन्न झाले व त्यांनी फोडाफोडीचे राजकारण सुरू केले, वयोमर्यादाचे कारण पुढे करत मोदी व शहा या जोडगळीने अनेक नेत्यांच्या हाती नारळ दिला.त्यामुळे आज भाजप जगातील मोठा राजकीय पक्ष म्हणून नावारूपाला येऊ शकला.पण ज्या कार्यकर्त्यांनी सात दशके पक्षासाठी खस्ता खाल्या,पक्षासाठी सतरंज्या उचलल्या,त्यांची अवस्था मात्र सध्या ” अल्पसंख्यांक समुदाया,” तील लोक,अशी झाली आहे.सत्तेच्या नावेत आज जे प्रवासी बसले आहेत,त्यापैकी ७० ये ८० % लोक हे बाहेरून आलेले आहेत.हे जे लोक बाहेरून या नावेत येऊन बसले आहेत,त्या सगळ्यांचे हात दगडाखाली सापडले आहेत.पक्ष फोडाफोडीसाठी भाजपने जो व्हायरस जन्माला घातला,त्याने अल्पावधीत चांगलीच किमया दाखवली व अनेक राज्ये पादाक्रांत केली.भाजपला अवघ्या दहा वर्षात मिळालेले हे अभूतपूर्व यश लक्षात घेवून इतर पक्षांनीही आता या ” इनकमिंग,” नावाच्या व्हायरससाठी आपल्या पक्षाची दारे सताड उघडली व पायघड्या पसरवण्यास सुरुवात केली.पण त्यांना भाजपच्या तुलनेत भरघोस प्रतिसाद मिळत नाही.ज्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व मनसेला साध्या ग्रामपंचायती वर आपला झेंडा फडकवता आला नाही,ते पक्षही आता अधून मधून ” इनकमिंग, ” व्हायरसला जोपासू लागले आहेत.जे विरोधक भाजपच्या या अशा उचापतीवर आजवर तोंडसूख घेत होते,आज तेच लोक पक्षाचे दुपट्टे घालुन नव्या रुग्णांचे आपल्या पक्षात स्वागत करू लागले आहेत. त्यामुळे या व्हायरसचा लवकरात लवकर नायनाट होऊ शकणार नाही,हे मात्र निश्चित आहे.

