दिपक मोहिते,
” हल्लाबोल,”
वर्ष उलटूनही परिस्थितीत कोणताही बदल नाही ; ” ये रे माझ्या मागल्या,” सुरूच,
लोकसभा निवडणुका होऊन आता सव्वा वर्ष तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला आहे.लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून २०२४ तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २४ नोव्हे.२०२४ रोजी लागला.या वर्षभराच्या काळात लोकांच्या आशा – अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या का ? त्यांच्या दैनंदिन जीवनात भेडसावणारे प्रश्न मार्गी लागले का ? त्यांना दिलासा मिळाला का ? या तिन्ही प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच मिळते.नव्याने निवडून आलेले खासदार व आमदार यांचे सध्या केवळ इव्हेंटस सुरू आहेत.

डहाणूचे आ.कॉ.विनोद निकोले व विक्रमगडचे हरिश्चंद्र भोये हे दोन आमदार वगळता इतर चार आमदारांची पाटी कोरीच असल्याचे अनुभवायला मिळाले.मागण्याची निवेदने देणे,संबधित मंत्री व सनदी अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करणे,व या अशा इव्हेंटचे फोटो व व्हिडियो समाजमाध्यमावर व्हायरल करणे,इ.उत्सवाला अक्षरशः उत आला आहे.तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी,यासाठी इच्छुक उमेदवार सध्या नको ते उपद्व्याप करण्यात मग्न आहेत.( रस्त्याची कामे सुरू असताना कॅमेरा समोर तोंड दाखवत उभे राहणे,आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणे,व समाजमाध्यमांवर सत्ताधारी व विरोधकांचे एकमेकांवर चिखलफेक करणे व विकासकामांचे श्रेय उपटण्यासाठी एकमेकांच्या उरावर बसणे,) या माध्यमातून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे लक्ष आपल्याकडे जावे व उमेदवारी मिळावी,यासाठी हा सारा अट्टाहास सुरू आहे.भाजप सध्या इतर पक्षाचे कार्यकर्ते फोडण्यात धन्यता मानत आहे.दर दोन दिवसाने पक्षात प्रवेश करणाऱ्यांच्या गळ्यात पक्षाचे दुपट्टे घालण्याचे व्हिडियो पाहून जिल्हावासीयाना अक्षरशः वीट आला आहे.गेल्या वर्ष व सव्वा वर्षात आपण लोकांची किती कामे केली ? जिल्हा व तालुक्याची किती विकासकामे केली याचा लेखाजोगा कोणीही मांडत नाही.मुख्यमंत्र्यांनी हे मान्य केले ते मान्य केले.मुख्यमंत्र्यांनी अमुक रकमेचा निधी मंजूर केला व मुख्यमंत्र्यांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले,हे सतत सुरू असलेले पालुपद पाहून व ऐकून जिल्हावासीय त्रासून गेले आहेत.या जिल्ह्याचे दुर्देव असे की रेल्वे,उड्डाणपूल,राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूककोंडी,इ.केंद्रीय स्तरावरील प्रश्नासंदर्भात जिल्ह्याचे खासदार मूग गिळून बसले आहेत.तर आमदार मंडळी व विरोधक हे दोघे एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्यात मग्न आहेत.एकंदर ही परिस्थिती लक्षात घेता जिल्हावासीयांची अवस्था आज ” आगीतून फुफाट्यात,” अशी झाली आहे.वसई व पालघर तालुक्यातील अंतर्गत रस्त्याची दुरावस्था पाहता आपण आजही अश्मयुगात राहत असल्याचा भास होतो.वास्तविक आपल्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर लोकसेवक अशी ओळख असलेले खासदार व आमदारांनी लोकांसमोर आपण केलेल्या कार्याचा अहवाल मांडायला हवा,पण तसा तो मांडला जात नाही,कारण गेल्या वर्षभरात नजरेत भरेल,असे एकही काम जिल्ह्यात झालेले नाही.फोडाफोडीचे राजकारण,फसवे जनता दरबार भरवणे व समाजमाध्यमाचा स्वैरवापर करत प्रसिद्धीत राहायचे,असे तीन उपक्रम राबवण्यात या लोकांनी धन्यता मानली.पूर्वीचे सत्ताधाऱ्यांना लोकांची तमा नव्हती,कामे होत नव्हती,म्हणून त्यांनी परिवर्तन घडवून आणले.पण परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही.त्यामुळे आज जिल्हावासीयांची अवस्था ” भीक नको,पण कुत्रं आवर,” अशी झाली आहे.ज्या मतदारांनी अगोदरच्या लोकप्रतिनिधींना धूळ चारली व तुम्हाला डोक्यावर घेतले,ते मतदार तुम्हालाही पायाखाली घेऊ शकतात,याची जाणीव विद्यमान लोकप्रतिनिधींनी ठेवायला हवी.

