दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
महाविकास आघाडी सोबत जाणे,बहुजन विकास आघाडीला परवडणारे नाही,
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर शिवसेना ( उबाठा ) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष आता एकत्र येण्याच्या तयारीत आहेत.पालघर जिल्ह्यात हे दोन्ही पक्ष बहुजन विकास आघाडीला सोबत घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.अशाप्रकारचा निर्णय झाल्यास त्यातून काय व कशाप्रकारचे आउटपुट मिळेल,हे आजच्या घडीला सांगता येणार नाही.पण असा निर्णय झाल्यास बहुजन विकास आघाडीला त्याचा फटका बसण्याची शक्यता मात्र अधिक आहे.
सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष माजी आ.हितेंद्र ठाकूर या दोघांचे एकमेकांशी किती सख्य आहे,हे जगजाहीर आहे.अशा परिस्थितीत त्यांची होणारी आघाडी या निवडणुकीत किती यशस्वी होईल,हे सांगता येणार नाही.जागावाटपावरून ही आघाडी फिसकटण्याची दाट शक्यता आहे.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत नालासोपारा मतदारसंघात बहुजन विकास आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोघांनाही जबर फटका बसला होता.वसई मतदारसंघात मात्र हितेंद्र ठाकूर यांनी भाजपच्या स्नेहा दुबे पंडित यांना कांटे की टक्कर दिली.येथे झालेल्या तिरंगी लढतीत स्नेहा दुबे पंडित यांनी हितेंद्र ठाकूर यांच्यावर ३ हजार १५३ मतांनी निसटता विजय मिळवला होता.येथे झालेल्या तिरंगी लढतीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार विजय पाटील यांनी ६२ हजार ३२४ मते मिळवली.या लढतीत झालेल्या मतविभागणीचा कायदा भाजपच्या स्नेहा दुबे पंडित यांना झाला व विजयश्रीची माळ त्यांच्या गळ्यात पडली.वास्तविक या विधानसभा निवडणुकी दरम्यान हितेंद्र ठाकूर हे महाविकास आघाडी सोबत गेले असते,तर त्यांचा पराभव झाला नसता.आता आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीत सामील होणे,म्हणजे ” वरातीमागून घोडे ,” अशी चर्चा सर्वत्र होत आहे.नालासोपारा व बोईसर विधानसभा या दोन्ही मतदारसंघात अशाप्रकारची आघाडी किंवा युती झाल्यास त्याचा किंचितही फायदा होणार नाही.बोईसर विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीची परिस्थिती अत्यंत बिकट आहे.पक्षाकडे तरुणांना आकर्षित करणारे खंबीर असे नेतृत्व नाही.तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मतदारसंघात अद्याप बाळसं धरलेले नाही.उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील पार ढेपाळलेल्या अवस्थेत असल्याचे पाहायला मिळत आहे.महाविकास आघाडीमध्ये जर मनसेला स्थान मिळाले तर त्याचा फटका बहुजन विकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे.गुजराती,मारवाडी,
उत्तर भारतीय व अन्य परप्रांतियांची एकगठ्ठा मते भाजपच्या पारड्यात जातील.अशा वातावरणात बहुजन विकास आघाडी जर महाविकास आघाडीत सामील झाल्यास ती त्यांची आत्महत्या ठरेल,असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.एकीकडे भाजपचे प्रचंड आव्हान,तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी असलेले विळा – भोपळ्याचे नाते व मनसेचे परप्रांतियाविषयी असलेला तिरस्कार,अशा कोंडीत बहुजन विकास आघाडी सध्या सापडली आहे.काल विरार येथे झालेल्या एका प्रकरणात मनसे व शिवसेनेचा एक पदाधिकारी ( उबाठा ) बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यासमवेत पाहायला मिळाला,त्यांचे अनेक पदाधिकारी मात्र या प्रकरणात कुठेही पाहायला मिळाले नाहीत.या सर्व घडामोडी लक्षात घेता महाविकास आघाडी एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाईल,असे वाटत नाही.

