दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
राज्य निवडणूक आयोगाची बैठक ; काहीही निष्पन्न होणार नाही,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सध्या बिगुल वाजलं असून सारे राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे.मतदारयादीतील गैरप्रकार प्रकरणी निवडणूक आयोग सध्या अडचणीत आले आहे.विरोधी पक्षाने या प्रश्नी दाखवलेली एकजूट ही प्रशंसनीय ठरली आहे.स्वातंत्र्यानंतरच्या काळात प्रथमच निवडणूक आयोगाच्या कारभारावर काळे ढग जमल्याचे पाहायला मिळाले.विरोधकांच्या रेट्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला नमते घेत काल सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घ्यावी लागली.या बैठकीत काही प्रमुख नेत्यानी मतदारयादीतील अनेक गैरप्रकाराकडे आयोगाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.पण या बैठकीतून चांगले काही निष्पन्न होईल,असे वाटत नाही.
एकेकाळी तत्कालीन निवडणूक आयुक्त स्व.टी.एन.शेषन यांनी आपल्या निष्पक्ष कारभाराने जगाचे लक्ष वेधून घेतले होते,तोच आयोग आज संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.लोकशाही व्यवस्थेत निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहणे,हे प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण नाही.पण ज्या सरकारवर लोकशाही व्यवस्थेची मदार आहे,तेच सरकार सध्या तिला नख लावण्यासाठी सध्या सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
एकेकाळी आपली लोकशाही व्यवस्था,ही जगात नावारुपाला आली होती.आज मात्र सारे जग आपल्याकडे संशयाने पाहू लागले आहे.ज्या व्यवस्थेत एकेकाळी लोकांच्या मताचा आदर केला जात होता,आज आपले सरकार पावलोपावली लोकमत पायदळी तुडवत आहे.प्रगल्भ न्यायव्यवस्था व लोकशाही व्यवस्थेचा चौथा स्तंभ,अशी ओळख असलेले हे दोन्ही स्तंभ आता डळमळीत झाले आहेत.या दोन्ही स्तंभांचा पाया ठिसूळ करण्यात सरकार स्वतः दोन पावले पुढे आहे.देशातील ही स्थिती,येणाऱ्या काळात आपल्याला अराजकाच्या दिशेने नेणारी ठरणार आहे.
जगभरातील देशांनी ईव्हीएम मशीनचा वापर बंद केला असताना निवडणूक आयोग मात्र लोकभावनेचा आदर करायला तयार नाही.ज्या प्रक्रियेवर लोक संशय व्यक्त करतात,त्यावर सरकारने विचार करायला हवा.आता तर मतदारयादीत असलेले प्रचंड गैरप्रकार उघडकीस आल्यानंतरही निवडणूक आयोग,ते मान्य करायला तयार नाही,यावरून आपला निवडणूक आयोग हा सरकारधार्जिणा झाल्याचे स्पष्ट होत आहे.काल राज्य निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते.या बैठकीस राज्यातील प्रमुख पक्षाचे प्रमुख उपस्थित होते.त्यांनी मतदारयादीतील यादीतील अनेक त्रुटी व गैरप्रकार आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिल्या.पण आयोग त्यावर कार्यवाही करेल,अशी शक्यता नाही.त्यामुळे या बैठकीतून फारसे काही निष्पन्न होणार नाही.

