दीपक मोहिते,
” राजकीय उलथापालथी,”
बविआचे पदाधिकारी व कार्यकर्ते फोडण्याच्या प्रक्रियेला प्रचंड वेग,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात पक्ष सोडणे व दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे,या अशा अवैध प्रक्रियेला चांगलाच वेग आला आहे.कोणत्याही परिस्थितीत आगामी निवडणुका जिंकायच्याच,या इर्षेने पेटलेल्या भाजपने महायुती सरकारमधील घटक पक्षासह इतर राजकीय फोडण्याचे जोरदार सत्र आरंभले आहे.त्यांच्या या उलाढालीला इतर पक्षातील नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून चांगलेच बळ मिळत आहे.एकीकडे भाजप,आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी सातत्याने प्रयत्न करत असताना दुसरीकडे इतर पक्ष मात्र केवळ बघ्याच्या भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे.वसई तालुक्यात भाजपने गेल्या तीन महिन्यापासून बहुजन विकास आघाडीला चांगलेच लक्ष्य केले आहे.या काळात त्यांच्या पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या गळाला लावण्यात ते यशस्वी झाले.गेल्या दोन दिवसात त्यांचे शेकडो कार्यकर्त्यांनी आपला पक्ष सोडत भाजपमध्ये प्रवेश केला.दर आठवड्याला फोडाफोडीचे राजकारण करायचे व मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळी फुटीर लोकांना मुंबईत न्यायचे,व पक्षप्रवेशाचा भव्य दिव्य सोहोळा घडवून आणायचा,असा हा फंडा आहे.
गेल्या दोन दिवसात असे दोन सोहोळे पार पडले.कालच्या सोहळ्यात वसई शहरातील बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला.येत्या पंधरा दिवसात बहुजन विकास आघाडीचे वसईतील दोन वरिष्ठ नेते भाजपच्या वाटेवर आहेत,अशी सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.या दोन नेत्यानी बविआला सोडचिट्ठी दिल्यास आगामी निवडणुकांमध्ये बहुजन विकास आघाडीला जबरदस्त सेटबॅक बसण्याची शक्यता आहे.काल प्रदीप पवार,नंदकिशोर पवार,ऍड.नैशाद पारीख,राजेंद्र चाफेकर,अमोल पाटील,अनेक स्थानिक दैनिक/साप्ताहिकाचे काही पत्रकार व शेकडो कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये दाखल झाले.भाजपने जर,फोडाफोडीचे सत्र असेच जारी ठेवले तर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाची अवस्था अत्यंत बिकट होण्याची शक्यता आहे.बहुजन विकास आघाडीच्या ज्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष उभारणीसाठी खस्ता खाल्या,ज्यानी अत्यंत बिकट काळात माजी आ.हितेंद्र ठाकूर यांच्या खांद्याला खांदा लावून स्वतःला झोकून दिले,ते आज पक्ष सोडून का जात आहेत ? या विषयी ठाकूर यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.सलग सहा वेळा विधानसभा निवडणुका जिंकणाऱ्या व राजकीय डावपेचात माहीर असलेल्या ठाकुराना तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद का कळू शकली नाही ? हा खरा प्रश्न आहे.गेल्या काही वर्षात त्यांचा तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद तुटला होता.राजकारणात कधी काहीही होऊ शकते,सत्तेच्या स्पर्धेत कोण कोणाचा नसतो,हे प्रगल्भ राजकारणी ओळख असलेल्या ठाकूर यांना का ओळखता आले नाही.एकेकाळी पक्षावर असलेली पोलादी पकड ढिली कशी होत गेली ? याविषयी त्यांनी गांभीर्याने विचार करायला हवा होता.त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मतदारांनी चकवा दिला.यापूर्वी लोकांसमोर पर्याय उपलब्ध नव्हता,पण गेल्या दहा वर्षात भाजपच्या रूपाने तो उपलब्ध झाल्यानंतर मात्र मतदारांनी मिळालेली संधी सोडली नाही.पक्षातील ठराविक मंडळींच्या भरवश्यावर ते कायम अवलंबून राहिले आणि तेथेच घात झाला.त्यांनी वेळीच भाकरी फिरवली असती तर आज त्यांच्यावर अशी वेळ आली नसती.
आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपने कोणत्याही परिस्थितीत ८० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.त्यासाठी भाजप,या निवडणुकीत साम,दाम,दंड व भेद,या नितीचा पुरेपूर वापर करेल, त्याला तोंड देण्याची ताकद,आजच्या घडीला बहुजन विकास आघाडीकडे नाही.त्यांच्या पक्षातील नाराज मंडळींना गळाला लावून भाजप विजयाची एकेक पायरी चढण्याच्या प्रयत्नात आहे,सध्या तरी ते या प्रयत्नात यशस्वी होत असल्याचे दिसत आहेत..

