दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
एकनाथ शिंदे गटाची अवस्था सध्या ” इकडे आड,तिकडे ईडी,” अशी झाली आहे,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आपल्या भाषणात अचानकपणे ” स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुकीमध्ये शक्यतो सोबत लढू,पण जेथे शक्य होणार नाही,तेथे समोरासमोर लढू, ” असे सांगत महायुतीमधील घटक पक्षांना एकप्रकारे गर्भित इशाराच दिला आहे.फडणवीस यांचे मुंबई,ठाणे,नवी मुंबई,छत्रपती संभाजीनगर व पुणे,या चार महानगरपालिकांवर कावळ्याची नजर आहे.कोणत्याही परिस्थितीत सोन्याची अंडी देणाऱ्या या चार महानगरपालिकेच्या सत्तेत इतर कोणी वाटेकरी होता कामा नये,यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.राज्यातील एकंदरीत राजकीय परिस्थिती लक्षात घेता,त्यांना बऱ्यापैकी यश मिळण्याची शक्यता आहे.या प्रयत्नात त्यांना जर चांगले यश मिळाले तर २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत ते ” एकला चलो रे,” अशा भूमिकेत असतील.

सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुगीचे दिवस संपुष्टात आले आहेत.तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांच्या दिल्ली वाऱ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली होती.दिल्लीश्वरानीही ” नव्या नवरीची नऊ दिवसाची नवलाई,” या म्हणीनुसार शिंदे यांचे चोचले चांगलेच पुरवले होते.पण विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली व शिंदे यांच्या नशिबाचे फासे उलटे पडण्यास सुरुवात झाली,ती आजतागायत….रुसत,फुगत अनेकदा त्यांनी साताऱ्यातील दरे या आपल्या मूळ गावाच्या वाऱ्या वाढवल्या पण,त्याचा काहीही परिणाम झाला नाही.गेल्या आठ महिन्यात दिल्लीश्वरानी त्यांना सतत ” युज अँड थ्रो,” अशा पद्धतीने वागवले.दिल्लीश्वराच्या अशा वागण्यामुळे शिंदे चांगलेच अडचणीत आले.अशा परिस्थितीमध्ये त्यांचे अनेक मंत्री व आमदारांच्या उचापतीमुळे ते हैराण झाले आहेत.त्यांच्या पक्षातील या बदनाम फरिश्त्यामुळे मंत्रिमंडळातील त्यांचे वजनही चांगलेच कमी झाले.नाशिक,रायगड या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून फडणवीस यांनी शिंदे यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या.” आमची कामे होत नाहीत,आम्हाला विकासकामांसाठी निधी मिळत नाही व आम्हाला कुत्रं देखील विचारत नाही,” असा सूर त्यांच्या गटाच्या जवळपास सर्वच मंत्री व आमदारांनी लावण्यास सुरुवात केली.त्याच सुमारास फडणवीस व दिल्लीश्वरानी अजित पवार यांच्या कारभाराचे वाभाडे निघूनही त्यांना झुकते माप देण्यास सुरुवात केली आहे.हे सारे रामायण घडत असताना फडणवीस यांनी ठाणे जिल्ह्यात शिंदे यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी गणेश नाईक यांचे प्यादे पुढे केले आहे व सध्या गणेश नाईक हे शिंदे यांच्या विरोधात रान उठवू लागले आहेत.फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षात सुरु केलेल्या अनेक विकासाच्या योजना बासनात गुंडाळून टाकल्या.
गेल्या आठ महिन्यात फडणवीस यांनी त्यांच्या खालील योजना रद्द केल्या.
१ ) आनंदाचा शिधा – बंद,२ ) माझी सुंदर शाळा – बंद,३ ) १ रु.त शेतकऱ्यांसाठी पीकविमा,४ ) स्वच्छता मॉनिटर – बंद,५ ) १ राज्य,१ गणवेश – बंद,६ ) लाडक्या भावाला अँप्रेन्टीसशिप – बंद,७ ) योजनादूत योजना – बंद,८ ) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना – बंद,
त्यामुळे शिंदे गटात सध्या चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. आजच्या घडीला शिंदे गटाची अवस्था ” इकडे आड तिकडे ईडी, ” अशी झाली आहे.

