दीपक मोहिते,
शह -प्रतिशह,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ; भाजप कामाला लागला…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात करील,अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत होती.गेल्या सात दिवसापासून भाजपमध्ये दाखल होणाऱ्या इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या लागलेल्या रांगा,लक्षात घेता तो अंदाज आता खरा ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.काल वसई व पालघर जिल्ह्यात भाजप व शिवसेनेने ( शिंदे गट ) या दोन्ही पक्षांनी ” इनकमिंग इव्हेंटस,” चे आयोजन केले होते.
गेल्या तीन महिन्यात भाजपने इतर पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्याना प्रवेश देऊन पक्षफोडीला सुरुवात केली आहे.हे करत असताना,भाजपने महायुतीमधील आपला सहकारी पक्ष शिवसेनेलाही लक्ष्य केल्यामुळे शिंदे यांच्या गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.वसई तालुक्यातही भाजपने हाच फंडा वापरला.महानगरपालिका,जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष फोडून पक्ष खिळखिळे करण्याचे भाजपचे प्रयत्न यशस्वी ठरू लागले आहेत.पण नव्याने धाऊक संख्येने दाखल होणाऱ्या कार्यकर्त्यामुळे भाजपमधील जुन्याजाणते पदाधिकारी व कार्यकर्त्याना नैराश्य आले आहे.” कानामागून येऊन तिखट होणाऱ्या कार्यकर्त्याना निवडणुकीचे तिकीट देण्याचे धोरण पक्षाने आखल्यास पक्षात आपले भवितव्य काय ? अशाप्रकारच्या नैराश्याने त्यांना गाठले आहे.भाजपमध्ये वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात अपील करण्याची पद्धत नाही.सुधीर मुनगुंटीवार,एकनाथराव खडसे व अन्य काही नेत्यांची अवस्था पाहून भाजपच्या या अजेंड्याला विरोध होण्याची फारशी शक्यता नाही.पण पक्षात नाराजी व नैराश्याचे वातावरण मात्र पसरले आहे.
पालघर जिल्हा हा मुंबई शहरापासून हाकेच्या अंतरावर आहे,या जिल्ह्याची भौगोलिक स्थिती,रस्ते,रेल्वे व जलमार्ग व उपयुक्त असा ११२ कि.मी.लांबीचा समुद्रकिनारा लक्षात घेऊन भाजप सध्या या जिल्ह्यात नियोजनबद्ध आखणी करत आहे.प्रस्तावित मुरबे व्यापारी बंदर,टेक्स्टाईल पार्क,विमानतळ व रेल्वे टर्मिनल,असे अनेक प्रकल्प भाजपच्या विचाराधीन आहे.त्यामुळे भाजप आपल्या सहकारी असलेल्या घटक पक्षांसह विरोधी पक्षांना मोडीत काढण्यासाठी प्रयत्नशील आहे.वाढवण बंदर उभारण्यासाठी जी मोडस ऑपरेंडी वापरली तशीच ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर वापरेल,अशी शक्यता आहे.जिल्ह्यात शिवसेनेचे ( शिंदे गट ) बऱ्यापैकी प्राबल्य आहे,ते कायम टिकून राहू नये,यासाठी त्यांनी सध्या शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्याना फोडण्याचे सत्र सुरू केले आहे.जिल्ह्यात डहाणू या विधानसभा मतदारसंघात मार्क्स.कम्यु.पक्षाचे काही अंशी वर्चस्व आहे.तर बहुजन विकास आघाडीचे अस्तित्व असून नसल्यासारखे आहे.जिल्ह्यात पक्षाकडे दमदार नेतृत्व नसल्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाची अवस्था अत्यंत दयनीय अशी झाली.२००९ साली झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतविभाजनाचा फायदा होऊन त्यांचे उमेदवार विजयी झाले होते.बोईसर विधानसभा मतदारसंघात त्यांच्या पक्षाच्या सलग तीनवेळा झालेल्या विजयामध्ये वसई तालुक्यातील मतदारांचा मोलाचा वाटा होता.पण गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराचा शिंदे गटाच्या विलास तरे यांनी वसई तालुक्यातील मते आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले.या निवडणुकीत झालेल्या तिरंगी लढतीत तरे यांनी राजेश पाटील यांचा तब्बल ४० हजार मतांनी पराभव केला.या मतदारसंघात बहुजन विकास आघाडीची दारुण अवस्था लक्षात घेता,भविष्यात ही जागा पुन्हा जिंकणे,त्यांना कदापी शक्य होणार नाही.दुसरीकडे शिवसेनेची ( उबाठा ) परिस्थितीही चांगलीच खालावली आहे.शिंदे गटाच्या बंडामुळे बोईसर व पालघर मतदारसंघात त्यांच्या पक्षाचे होत्याचे नव्हते झाले.त्यांच्या पक्षाकडेही सध्या नेतृत्वाचा अभाव आहे.लोकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती आहे,पण त्याचे रूपांतर मतांमध्ये करण्याची ताकद त्यांच्या
एकाही पदाधिकाऱ्यामध्ये नाही.तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यात किंचितही अस्तित्व नाही.पक्ष उभारणीसाठी पक्षाकडे स्थानिक पातळीवर उमेदीचा चेहरा असावा लागतो,आजच्या घडीला भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) हे दोन पक्ष वगळता इतर पक्षांची नोंद घ्यावी,अशी स्थिती नाही.त्यामुळे शिंदे गटाला सर्वाधिक धोका भाजपकडूनच होण्याची शक्यता आहे.त्यासाठी भाजप निवडणुकीपूर्वी शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हमखास गळाला लावण्याची शक्यता आहे.

