दीपक मोहिते,
निवडणूक रणसंग्राम २०२५,
पालघर जिल्ह्यात भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने पुन्हा फोडाफोडीच्या राजकारणाला चांगलीच हवा दिली आहे.काल विविध पक्षाचे दोन ते हजार कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख भरत रजपूत,खा.डॉ.हेमंत सवरा व आ.हरिश्चंद्र भोये यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.यापूर्वी पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम व त्यांच्या सहकाऱ्यांना पक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले होते.आजचा हा प्रवेश सोहोळा हा आगामी निवडणुकांमध्ये मित्रपक्षासह विरोधकांना इशारा देणारा असल्याचे मानले जात आहे.या सोहोळ्यानंतर जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात फोडाफोडीच्या राजकारणाला उत येण्याची शक्यता आहे.त्यामुळे जिल्ह्यातील सारे राजकीय पक्ष सावध झाले आहेत.
मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यावर भाजपला वर्चस्व मिळवायचे आहे.त्यासाठी त्यांनी नियोजनबद्ध आखणी केली आहे.गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने डहाणू विधानसभा वगळता इतर पाच विधानसभा मतदारसंघात बाजी मारली. ( वसई,नालासोपारा,
विक्रमगड -भाजप व पालघर/ बोईसर – शिवसेना,शिंदे गट )
जिल्ह्यात मिळालेल्या या अभूतपूर्व यशानंतर आता भाजपचा अश्वमेघ घोडा चौफेर उधळण्याच्या तयारीत आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशानंतर भाजप,आता पालघर जिल्हा परिषद,८ पंचायत समित्या,२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायती जिंकण्यासाठी पुढे सरसावली आहे.काही किरकोळ अपवाद वगळता पालघर जिल्ह्यावर सध्या शिवसेनेचे ( शिंदे गट ) वर्चस्व आहे.ते मोडून काढण्यासाठी भाजप सध्या स्वबळाचा नारा देऊ लागला आहे.फोडाफोडीचे राजकारण करत निवडणुकीपूर्वी विरोधी पक्ष खिळखिळा करायचा व निवडणुका जिंकायच्या असा भाजपचा अजेंडा आहे.दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम व त्यांच्या सहकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भविष्यात आपल्या समोर काय वाढून ठेवले आहे,याची चुणूक दाखवली होती.त्यानंतर काल जिल्ह्यातील जवळपास सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्त्याना ( अडीच ते तीन हजार ) त्यांनी गळाला लावले.ऐन निवडणुकीच्या तोंडावर एवढ्या मोठ्याप्रमाणावर फोडाफोडीचे राजकारण सुरू केल्यामुळे शिंदे गटाचे धाबे दणाणले आहे.या प्रवेश सोहोळ्यानंतर माध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी आगामी काळात विविध पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्याना भाजपमध्ये सामील करून घेणार असल्याचे सांगितले.वसई व नालासोपारा विधानसभा मतदारसंघातही भाजप अशीच खेळी खेळण्याच्या तयारीत आहे.

