दीपक मोहिते,
आम्हाला पैश्याची उधळपट्टी करणारी मॅरेथॉन स्पर्धा नको,आम्हाला दर्जेदार नागरी सुविधांची गरज आहे…
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई विरार शहर महानगरपालिकेची १३ वी मॅरेथॉन स्पर्धा प्रशासनाने तात्पुरती स्थगित केली आहे.मनपा प्रशासनाचा हा निर्णय स्तुत्य असला तरी याविषयी करदात्यांच्या मनात अनेक प्रश्नाचे काहूर उठले आहे.आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी ते कारण खरं नाही.तालुक्यातील रस्त्याची झालेली पार दुर्दशा हे कारण,या निर्णयामागे असावा,असा संशय सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे.
वास्तविक ही मॅरेथॉन स्पर्धा आर्थिकदृष्ट्या बोजवारा उडालेल्या वसई विरार शहर महानगरपालिकेला परवडणारी नाही.पण प्रसिद्धीच्या हव्यासापोटी गेली बारा वर्षे या स्पर्धेवर कोट्यवधी रु.ची उधळपट्टी झाली.गेल्या बारा वर्षात शेकडो कोटी रु.चा अक्षरशः चुराडा झाला.आज महानगरपालिका क्षेत्रात अनेक विकासकामे गेल्या दीड दशकापासून प्रलंबित आहेत,त्यामध्ये डंपिंग ग्राउंड,एस.टी.पी.
डळमळीत परिवहन सेवा ( कंत्राटी कामगारांना नियमित वेतन न मिळणे,) अनेक भागात नागरिकांना प्यायला पुरेसे पाणी न मिळणे,असे एक ना अनेक विकासकामे प्रलंबित असताना महानगरपालिका गेली बारा वर्षे या स्पर्धेवर शेकडो रु.उधळत आली.हा अट्टाहास कशासाठी ? राज्यभरातून वाहवा मिळवण्यासाठी हे सारे घडत असेल तर करदात्यांनी ही उधळपट्टी थांबवण्यासाठी मनपा प्रशासनावर दबाव वाढवायला हवा.आता आयुक्त याविषयी खुलासा करत आहेत की स्पर्धा रद्द झालेली नाही,तर ती निवडणुकीच्या कामकाजामुळे लांबणीवर टाकण्यात आली आहे.हे जरी खरे असले तरी मनपा क्षेत्रातील रस्त्याची झालेली दुर्दशा हे देखील एक कारण या निर्णयामागे आहे.पण,ही स्पर्धा कायमची बंद करणे व तो पैसा विकासकामांसाठी वापरण्यात यावा,अशीच करदात्यांची इच्छा आहे.आमची महानगरपालिका देशात वेगळ्याच कारणाने नावारूपाला आली आहे,त्या कारणांची पुन्हा पुन्हा उजळणी करणे,योग्य होणार नाही.या स्पर्धेचे आयोजन करून कोणी आमची वाहवा करणार नाही,कारण,गेल्या बारा वर्षात ” आम्ही कंबरेचे सोडून डोक्याला कधीच गुंडाळले आहे.” त्यामुळे आम्हाला प्रसिद्धी किंवा नाव कमवण्याची हौस बिलकुल नाही.आम्हाला हवंय,पिण्यापूरते पुरेसे पाणी,चांगले रस्ते,प्रभावी परिवहन सेवा,दर्जेदार वैद्यकीय सेवा,चार शहराचा नियोजनबद्ध विकास व इतर आवश्यक नागरी सोयी-सुविधा होय …

