दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,”
आपला देश कधीही ” आत्मनिर्भर,” होऊ शकणार नाही,
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परकीय नागरिकांसंदर्भात जी काही भूमिका घेतली आहे,ती त्यांच्या देशाच्या हिताची आहे. आज त्यांच्या देशात लाखो आशियाई स्थायिक झाले आहेत.त्याचा परिणाम रोजगार व त्यांच्या अर्थव्यवस्थेवर जाणवू लागला आहे.त्यामुळे ट्रम्पच्या सरकारने विजा विषयक कायदे कडक करण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे जगभरात सध्या स्थानिक व स्थलान्तरीत,असा वाद वेगाने रंगू लागला आहे.अमेरिकमध्ये ट्रम्प सरकार पुन्हा सत्तेत स्थानापन्न झाल्यानंतर या वादाला अधिक गती मिळाली व त्याचे अल्पावधीत उमटलेले पडसाद आपण पाहिले.अमेरिकेत भारतीय वंशाच्या तरुणावर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.या सर्व घडामोडीमागे बेरोजगारी व आर्थिक स्तर अशी दोन महत्वाची कारणे आहेत.रोजगार व व्यवसायाकरीता इतर देशातुन अमेरिकेत स्थलांतरीत होणाऱ्यांची संख्या सतत वाढत गेल्यामुळे मूळ निवासी असलेल्या अमेरिकन बेरोजगार तरुणांना रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे.याच कळीच्या मुद्द्यावर डोनाल्ड ट्रम्प यानी नेमके बोट ठेवत दोन वेळा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.स्थानिक जनतेच्या या भावनिक प्रश्नाला ट्रम्प यानी सर्वोच्च प्राधान्य दिल्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.त्यांचे सरकार पहिल्यांदा सत्तेत आल्या आल्या डोनाल्ड ट्रम्प सरकारने व्हिसा प्रक्रियेवर अनेक निर्बंध टाकले होते.अमेरिकेनंतर ब्रिटन,म्यानमार,व्हेनेनझूला व मेक्सिको या राष्ट्रातही या प्रश्नाने उचल खाल्ली व जगभरात स्थलांतरण हा कळीचा मुद्दा ठरू लागला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा घड़ामोडी घडत असताना विविध देशात अंतर्गत पातळीवरही स्थानिक व उपरे या वादाने अक्राळ विक्राळ स्वरुप धारण करण्यास सुरुवात केली.विशेषकरून महाराष्ट्रात १९६९ पासून या वादाने मूळ धरले.सेनेने याच वर्षी दाक्षिणात्याच्या विरोधात ” हटाओ लुंगी,बजाओ पुंगी,” अशी आरोळी ठोकत तीव्र आंदोलन छेड़ले.त्यांच्या या आंदोलनाचा सेनेला बऱ्यापैकी फायदा झाला,मराठी अस्मिता जागी झाली व मराठी जनमानसात सेनेने भरभक्कमपणे पाय रोवले.त्यांच्या या आंदोलनाने विविध कंपन्या व आस्थापनामध्ये मराठी चेहरे दिसू लागले.स्थानिक मराठी माणूस,केंद्रबिंदु ठरवुन सेनेची वाटचाल सुरु झाली,व ती कालांतराने यशस्वीही ठरली.सत्तेच्या राजकारणासाठी त्याना जणू गुरुकिल्लीच सापडली.
त्यानंतर काही काळ सेनेने ” भय्या हटाव,” मोहीम सुरु केली.नोकरीनिमित्त मुंबईत येणाऱ्या उत्तर भारतीय तरुणांवर हल्ले करणे,त्याना मुलाखती देण्यापासून रोखणे,अशा प्रकारची आंदोलने करण्यात आली.परंतु या आंदोलनाचा फायदा होण्याऐवजी सेनेची मुम्बईमध्ये पीछेहाट झाली,त्यामुळे सेनेने या मुद्द्याला कालांतराने तिलांजली दिली.
त्यानंतर मनसेने हा वाद पुन्हा उकरुन काढला,उत्तर भारतीय व मनसे कार्यकर्ते,असा संघर्ष मुंबईकरानी चांगलाच अनुभवला.परंतु मनसेलाही त्याची जबर राजकीय कीमत चुकवावी लागली,तरीही मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे या मुद्द्यावर आजही ठाम आहेत.
मुंबईच्या वाताहतीस परप्रांतियांचे लोंढेच कारणीभुत असल्याचे त्यांचे ठाम मत आहे व त्यांच्या प्रत्येक भाषणात ते याविषयी आग ओकत असतात.अशा सर्व परिस्थितीमध्ये काही वर्षांपूर्वी गुजरात राज्यातील बनासकाठा जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेने सामाजिक सलोखा पणाला लागला,एका बालिकेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेमध्ये एका बिहारी तरुण असल्याचे स्पष्ट झाले व सर्वत्र हिंसाचाराचे थैमान सुरु झाले.उत्तर भारतीय व बिहारी हे दोन्ही समाज लक्ष्य ठरले. गुजरात राज्यातील ५० हजार उत्तर भारतीय अवघ्या ७ दिवसात आपल्या मूळ गावी परतले.त्याना परत येण्याचे आवाहन करण्यात आले तरी ते माघारी फिरले नाहीत.यापूर्वी आसाम राज्यातही असाच हिंसाचार झाला होता.देश प्रजासत्ताक होऊन ७८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता प्रादेशिक वादाचे चटके बसु लागले आहेत.भाषावार प्रांतरचना,भविष्यात आपल्याला विनाशाकडे नेणारी ठरू शकते,याकडे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या अनेक
सहकाऱ्यानी त्यांचे लक्ष वेधले होते,परंतु दुर्दैवाने त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही.त्याचे चटके आता बसु लागले आहेत.
आज अन्य देशातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतरण,हे भविष्यात अमेरिकन तरुणांच्या जीवावर उठणार आहे,रोजगाराचा प्रश्न अधिक जटील होणार आहे,तसेच या सर्व घडामोडी देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण करणारा आहे,हे लक्षात घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी आता विजा आवळण्यास सुरुवात केली आहे.देशांतर्गत होणारे स्थलांतर असो किंवा परदेशात होणारे असो,ही प्रक्रिया स्थानिकांच्या मुळावर येत असते,हेच यामधून निष्पन्न होत आहे.त्यामुळे ” आत्मनिर्भर भारत, ” व ” मेक इन इंडिया,” या दोन्ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याची गरज आहे.पण आपले केंद्र सरकार या ज्वलंत विषयी प्रचंड उदासीन आहे.ज्या देशात २ कोटी रोजगार निर्मितीचे काय झाले ? असा प्रश्न विचारणाऱ्या तरुणांना राष्ट्रद्रोही ठरवले जाते,तो देश कदापि आत्मनिर्भर बनू शकत नाही.

