दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
आदिवासी पालघर जिल्ह्याची ओळख वेगाने बदलत चालली आहे,
सरकार दरबारी पालघर जिल्ह्याची ओळख ” आदिवासी जिल्हा,” अशी असली तरी आता त्यामध्ये झपाट्याने बदल होत असून हा जिल्हा आता ” प्रकल्पग्रस्त जिल्हा,” म्हणून ओळखू लागला आहे.केंद्र व राज्य सरकार,एका मागून एक असे अनेक विनाशकारी प्रकल्प या जिल्ह्यावर लादू पाहत आहे.या जिल्ह्याला लाभलेला निसर्गरम्य समुद्र व पूर्व भागातील विपुल वनसंपदा जिल्ह्याच्या मुळावर आले आहे.

१९८० – ९० च्या दशकात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची या जिल्ह्यावर विशेष करून वसई तालुक्यावर वक्रदृष्टी पडली व जिल्ह्याच्या वाताहतीला सुरुवात झाली.वाढवण व अणू ऊर्जा प्रकल्प टप्पा – १ व २,वाढवण काँग्रेस व आता मुरबे व्यापारी बंदर निर्मितीमध्ये भाजप अशा या दोघांनी मोलाची कामगिरी पार पडली.
आता देवेंद्र फडणवीस सरकारने तुंगारेश्वर अभयारण्यमधील जमीन उद्योगपती अदानीच्या घश्यात घालण्यासाठी
कंबर कसली आहे.ही जमीन अदानी एनर्जी या वीज कंपनीच्या वितरणासाठी ही मातीमोल दराने कंपनीच्या घश्यात टाकली आहे. डहाणू – वाढवण येथील महाकाय बंदरासाठी केंद्र सरकारने येथील पंचक्रोशीतील सुमारे ३२ गावे विस्थापित करण्याचे षडयंत्र रचले व त्यामध्ये ते यशस्वी देखील झाले.स्थानिक भूमिपुत्रांना देशोधडीला लावणारा हा केंद्र सरकारचा निर्णय मुळावर आला असताना केंद्र सरकारने पालघर तालुक्यातील मुरबे या समुद्रकिनारी व्यापारी बंदर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मासेमारी व्यवसाय,आदिवासी समाजाचा रोजगार,मत्स्यउत्पादन व सागरी जैवविविधता सारे काही उध्वस्त होणार आहे.केंद्र सरकारच्या भांडवलदारांना झुकते माप देण्याच्या विनाशकारी धोरणामुळे पर्यावरण व वनसंपदा,लयाला जाणार आहे.
एरवी,वनविभागाच्या जमिनीवर आदिवासींना साधे घर बांधू दिले जात नाही,त्यासाठी सरकार कडक कायदे करते,तेच सरकार अदानी व अन्य उद्योगपतीसाठी आता पायघड्या घालत आहे.तुंगारेश्वर येथील जंगलात अनेक औषधी वनस्पती आढळतात.ते सारे आता अदानी समूहाच्या या वीजनिर्मिती प्रकल्पामुळे उध्वस्त होणार आहे.तर दुसरीकडे भर समुद्रात मातीभराव करून उभारण्यात येणारे महाकाय वाढवण,मुरबे येथील व्यापारी बंदर व वसई तालुक्यातील तुंगारेश्वर अभयारण्य येथे होणारे वीज वितरण प्रकल्पामुळे भविष्यात अनेक समस्या उभ्या ठाकणार आहेत.त्यामध्ये पर्यावरण,प्रदूषण,
स्थानिकांचा रोजगार व शेती / बागायती क्षेत्रांचा समावेश आहे.हे सारे घडत असताना या ज्वलंत विषयी सर्वच राजकीय पक्ष मूग गिळून बसले आहेत.त्यामुळे स्थानिक भूमिपुत्र,हे सरकार आपल्या जमिनी ताब्यात घेईल,अशा भितीतून आपल्या जमिनी कवडीमोल दराने धनदांडग्यांना विकू लागले आहेत.जिल्ह्याचा समुद्रकिनारा,सुपीक जमिनी,राष्ट्रीय महामार्ग व जिल्ह्याचे पोषक हवामान हे आता या जिल्ह्याच्या मुळावर येऊ घातले आहे.

