दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,”
महानगरपलिका निवडणुका मार्च – एप्रिलपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता…
महानगरपालिकांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकांचे भवि्तव्य इव्हीएम मशिन्सच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. दरम्यान निवडणूक आयोग इतर राज्यातील इव्हीएम मशिन्स आणून निवडणूक जाने. महिन्यात होऊ शकतात का ? याविषयी पडताळणी करत आहे.मात्र या पर्यायाला राज्यातून विरोध होण्याची शक्यता आहे.तसेच आयोगाने हा पर्याय स्विकारला तर प्रकरण न्यायालयात जाईल व निवडणुका अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडतील,असे निवडणूक विषयक तज्ञाचे म्हणणे आहे.
निवडणूक आयोगाकडून महापालिकांच्या निवडणुका जाने.अखेरपर्यंत घेण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू असला तरी ‘ईव्हीएम,’ च्या उपलब्धतेवरच ते शक्य होणार आहे. महापालिकांसाठी वेळेत ‘ईव्हीएम,’ उपलब्ध न झाल्यास महापालिकांच्या निवडणुका या दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर मार्च-एप्रिलमध्ये होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ऑक्टो.अखेरीपर्यंत घेणे, बंधनकारक होते.मात्र,प्रत्यक्ष निवडणुका घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी व समस्या लक्षात घेता या निवडणुकांचा कालावधी निवडणूक आयोगाकडून वाढवून घेण्यात आला आहे.राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपालिका, नगरपरिषद आणि महापालिकांच्या निवडणुका घेण्यासाठी आवश्यक असणारी प्रभाग रचना,गट व गण इ.सोपस्कार वेगाने हातावेगळे करण्यास सुरुवात केली आहे.महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत येत्या १५ दिवसांत काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.मतदारयादी अंतिम झाल्यानंतर त्यानुसार बूथनिहाय याद्याचे विलीगीकरणाचे कामही या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीसाठीची कार्यवाही पूर्ण करण्यात येत असली, तरी प्रत्यक्ष मतदान घेण्यासाठी लागणाऱ्या ” ईव्हीएम,” चा तुटवडा हा कळीचा मुद्दा ठरला आहे.जिल्हा परिषदा,पंचायत समितीच्या निवडणुका तातडीने घेण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.या निवडणुकांसाठी दिवाळीनंतर कधीही आचारसंहिता जाहीर होऊ शकते.त्यानुसार नोव्हें.अखेर किंवा डिसें.च्या पहिल्या आठवड्यात मतदान होईल आणि निकाल देखील जाहीर होतील.
जिल्हापरिषद,पंचायत समित्यांच्या निवडणुकीत वापरण्यात येणारे ” ईव्हीएम,” हे निकालानंतर ४५ दिवस सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत.याकाळात कायद्यानुसार या यंत्रांमधील ” डेटा,” हा डिलिट करण्यात येणार नाही.मात्र,या कालावधीनंतर या ” ईव्हीएम,” मशिन्स महापालिका निवडणुकांसाठी वापरण्याचे निवडणूक आयोगाने ठरवले आहे.
जिल्हा परिषद,पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्यानंतर नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. राज्यात एकाच वेळी बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे ” ईव्हीएम,” मशीनचा तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम शांततेत पार पडला नाही आणि तेथील ” ईव्हीएम,” मशिन्स जर न्यायालयीन प्रक्रियेत अडकले,तर त्याचा फटका महापालिका निवडणुकांच्या वेळापत्रकाला बसणार आहे.त्यामुळे आयोग बाहेरच्या राज्यातील ” ईव्हीएम,” मशिन्स या महानगरपालिका निवडणुकामध्ये वापरण्याच्या तयारीत आहे.सध्या या पर्यायावर विचार करण्यात येत आहे.या अशा परिस्थितीमुळे महानगरपालिकांच्या निवडणुका या जाने.२६ मध्ये घेण्याचे प्रस्तावित आहे.पण, त्यासाठी पुरेशा इव्हीएम मशिन्स जर उपलब्ध होऊ शकल्या नाही तर या निवडणुका मार्च किंवा एप्रिल महिन्यापर्यंत लांबणीवर पडतील,अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.

