दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
आदर्श नागरिक म्हणून आपली जबाबदारी फार मोठी आहे,
नगरसेवक हा नेमका कसा असावा ?
आपल्या नगरसेवकाबाबत आपल्या अपेक्षा कशा असायला हव्यात ? असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत ? निवडणुकीविषयी जागृत असणे,हे आदर्श नागरिक म्हणून आपली जबाबदारी असते,ती आपण पार पाडली तरच परिसराचा नियोजनबद्ध विकास होऊ शकतो.
नगरसेवक,या शब्दाची व्याख्या कशी आहे ? ते आपण जाणून घ्यायला हवे.नगरसेवक हा लोकसेवक असतो,आणि त्याला जाब विचारणे,हे आपले प्रथम कर्तव्य असते.
नगरसेवक आपल्याच परिसरातील प्रभागात राहणारा असावा,तसा तो असल्यास,त्याला त्या भागातील अडचणी व समस्याची जाणीव असू शकते.
नगरसेवकपदाची निवडणूक लढवणारा उमेदवार हा लोकांच्या अडचणी व सुखः दुःखात सहभागी होणारा असावा.स्वतःची प्रतिष्ठा,नाव किंवा फक्त पैसे कमवणारा नसावा,
नगरसेवक हा समाजातील तरुणांना व्यसनाची सवय लावणारा नसावा.तसेच आपल्या प्रभागातील बेरोजगारांना नोकरी,व्यवसाय उद्योगधंद्याला प्रोत्साहन देणारा असावा.
नगरसेवक हा फक्त मत मागण्यापुरता त्या भागात फिरकणारा असू नये.निवडून आल्यानंतर त्या भागात पाच वर्ष त्या भागाच्या अडचणी सोडवण्यासाठी त्याने कटिबद्ध असायला हवे.
नगरसेवक भ्रष्टाचारी किंवा पैश्याच्या जीवावर निवडणूक लढवणार नसावा तर तो गोर गरीब जनतेच्या अडचणीची जाणीव असणारा सामान्य लोकसेवक असावा.नगरसेवक हा त्या भागातील रस्ते,पाणी,वीज,वैद्यकीय सेवा व शिक्षण व स्वछता यांना प्राधान्य देऊन विकासकामे करणारा असावा.तो फक्त मतासाठी पैसे देऊन निवडून येऊन पाच वर्ष प्रभागाकडे दुर्लक्ष करणारा नसावा.
म्हणून मतदारांनी यावेळी कोणत्याही भूलथापाना बळी न पडता आपले मौल्यवान मत आपल्या मदतीला धावून येणाऱ्या व्यक्तीलाच करावे.
तसेच मतांसाठी दारात येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला मतदाराने प्रभागाच्या विकासासंदर्भात ” तुझे व्हिजन काय आहे ?” असा प्रश्न विचारला पाहिजे.तो जर स्वतःचे व्हिजन सांगू शकला नाही तर तो आपल्या प्रभागासाठी लायक उमेदवार नाही,असे समजून त्याला आपली मते देऊ नका,
कारण,आज अशी स्थिती निर्माण झाली आहे की नगरसेवकपद हे लुटीचे पद आहे,सात पिढ्या बसून खाता येईल,इतका पैसा आपण मिळवू शकतो,अशी राजकारण्याची धारणा झाली आहे.

