दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
अन्यथा,ही केवळ नौटंकीच ठरेल…
रस्त्याच्या दुरावस्थेसंदर्भात वसई तालुक्याचे राजकारण सध्या ढवळून निघाले आहे,साऱ्या राजकीय पक्षांना नागरिकांची घोर चिंता लागली आहे.त्यामुळे राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते महानगरपालिकेच्या गलथान कारभाराविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.त्यामुळे आम्हा वसई – विरारकर नागरिकांचा उर अक्षरशः भरून आला आहे.सत्ताधारी पक्ष आपल्याच सत्तेविरुद्ध आंदोलन करू शकत नाही,त्यामुळे ही मंडळी सध्या रील बनवण्यात मग्न आहेत.तर दुसरीकडे काँग्रेसचा पर्यावरणवादी नेता चार ते पाच कार्यकर्त्याना सोबत घेऊन अधून मधून रास्ता रोको करत असतो.प्रशासनातील अधिकारी देखील अशा आंदोलनाकडे ” पावसाळ्यातील बेडूक,” या उद्देशाने पाहत असतात.महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले राजकीय पक्ष जागे झाले आहेत,हे न समजण्याइतके वसईकर नागरिक नक्कीच दुधखुळे नाहीत.निवडणुकीच्या तोंडावर हे बेडूक चिखलातून बाहेर येतात व डरांव डरांव करू लागतात,हे नित्यनेमाचे झाले आहे.त्यातून सर्वसामान्य नागरिकांचे भले होईल,अशी सुतराम शक्यता नाही.

सत्ताधारी पक्ष रस्ते पुनर्बांधणी व दुरुस्ती/डागडुजीसाठी आमच्या देवाभाऊंनी शेकडो कोटी रु.दिले.अमुक अमुक उड्डाणपूल व रस्ते लवकरात लवकर होणार व वसई उपप्रदेशातील नागरिकांना दिलासा मिळणार,असे छातीठोकपणे सांगू लागले आहेत.तर दुसरीकडे विरोधक,सत्ताधारी पक्षाकडून व्हायरल होणाऱ्या व्हिडिओविरुद्ध छाती बडवत मातम करत आहेत.या सर्व धामधुमीत सर्वसामान्य माणसाचे दैनंदिन जीवन मात्र संकटात सापडले आहे.मरणयातना देणाऱ्या या रस्त्यावरून येजा कशी करायची ? प्रवासात आपला जीव कसा वाचवायचा ? अशा प्रश्नांनी त्याला भंडावून सोडले आहे.ही जी राजकीय मंडळी रस्त्याच्या दुरावस्थेवरून गळा काढत आहेत,ती निवडणुकीनंतर औषधालाही सापडणार नाहीत,हे वसईकरानाही माहीत आहे.देवाभाऊ किती पैसा देतात,किती योजना मंजूर करतात ? यापेक्षा किती कामांना प्रत्यक्ष सुरवात झाली ? याला त्यांच्या लेखी सर्वाधिक महत्व आहे.आपण लोकांसाठी रस्त्यावर उतरतो किंवा देवाभाऊ यांच्याशी चर्चा करतो,यापेक्षा वसईकर जनतेच्या अपेक्षा किती पूर्ण करतो,याला अनन्यसाधारण महत्व आहे.निवडणुकीसाठी लोकांची मते मिळवण्यासाठी हे सारे उपद्व्याप करावे लागतात हे जरी खरे असले तरी,ते न्यायाला धरून नाही.रस्त्यावरील खड्ड्यामुळे होणाऱ्या अपघातात कोणाचा तरुण मुलगा,कोणाची पत्नी,कोणाचा भाऊ जीवानिशी जातो व त्या कुटुंबाचा संसार उघड्यावर पडतो,याची जाणीव सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना होईल,तेंव्हाच रस्त्याची कामे मार्गी लागतील व या ऐतिहासिक वसई नगरीला पुन्हा एकदा झळाळी येईल.अन्यथा हे सारे असंच चालत राहणार,यातून लोकांना दिलासा मिळेल, असे काहीतरी निष्पन्न व्हायला हवे,अन्यथा ही आंदोलने,मंत्र्यांच्या भेटी,निधीच्या घोषणा व मंजुरी,हे सर्व केवळ नौटंकीच ठरणार आहे.

