दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
सरन्यायधीशांवर हल्ला ; हा संविधानाच्या मूलभूत गाभ्यावर हल्ला,
आजवर धर्माने न्यायदान क्षेत्र वागळता इतर सर्व क्षेत्रात घुसखोरी केली.काल घडलेल्या घटनेने न्यायालये देखील आता सुटू शकलेली नाहीत,हे स्पष्ट झाले आहे.
आज सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे न्यायालयात काही काळ गोंधळ उडाला होता.या वकिलाला बाहेर काढताना, त्याने ” सनातनचा अपमान भारत सहन करणार नाही, ” असं म्हटलं आहे.
ही घटना घडत असताना सरन्यायाधीश गवई मात्र शांत होते आणि त्यांनी खटल्याची सुनावणी तशीच सुरू ठेवली.
तो बूट सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती चंद्रन यांना लागून त्यांच्या मागच्या बाजूला पडला.
नंतर त्या वकिलाने न्यायमूर्तींची माफी मागितली आणि सांगितलं की त्याची ही कृती फक्त सरन्यायाधीशाना उद्देशून होती.न्यायालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर सरन्यायाधीशांनी या घटनेने विचलित न होता त्यांनी आपले कामकाज सुरू ठेवले.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी तीव्र निषेध केला आहे.
खा.राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटलं, ” सरन्यायाधीशांवर झालेला हल्ला,आपल्या न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर आणि संविधानाच्या मूलभूत गाभ्यावर करण्यात आलेला हा हल्ला आहे.आपल्या देशात अशा द्वेषाला स्थान नाही आणि या घटनांचा सर्व थरावरून निषेध व्हायला हवा,”
काँग्रेसच्या अधिकृत हँडलवरून जारी केलेल्या निवेदनात सोनिया गांधी म्हणाल्या, ” सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शब्दही अपुरे आहेत.हा हल्ला केवळ त्यांच्यावर नाही,तर आपल्या संविधानावर आहे. सरन्यायाधीश गवई यांनी दाखवलेली नम्रता उल्लेखनीय आहे,परंतु देशाने तीव्र वेदना आणि संतापाच्या भावनेसह त्यांच्यासोबत एकजुटीने उभे राहिले पाहिजे.”
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट ) अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेला न्यायव्यवस्था, लोकशाही,संविधान आणि देशाचा घोर अपमान असल्याचे म्हटलं आहे.ते म्हणाले, ” लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांना आधार मानून वाद-प्रतिवादातून न्याय्य भूमिकेकडे जाण्यासाठी न्यायव्यवस्था असते.त्याच न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत मुख्य न्यायमूर्तींवरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणं,हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे,तर लोकशाही,संविधान आणि देशाचा अपमान आहे.”
आपल्या देशात पेरलं जाणारं विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही जुमानत नाही.ही देशासाठी धोक्याची घंटा आहे.या घटनेचा मी निषेध करतो आणि भारतीय लोकशाहीचे स्तंभ कमकुवत होऊ नयेत,यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याची ग्वाही देतो,”
हा भ्याड हल्ला असल्याची प्रतिक्रिया भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (गवई) नेते आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांचे बंधु डॉ.राजेंद्र गवई यांनी दिली.
ते म्हणाले, ” भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला भ्याड हल्ला आहे.मानसिकदृष्ट्या संतुलन बिघडलेल्या व्यक्तीद्वारे करण्यात आलेला हा हल्ला आहे.फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या सर्व अनुयायांना मी आवाहन करतो की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये,याची काळजी घ्या.”
आपण सर्व बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक आहोत. आपल्याला संविधानाच्या मार्गाने जायचे आहे.त्यामुळे शांतता राखा,असं आवाहन त्यांनी केलं.
सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने पत्रक काढून या घटनेचा निषेध केला आहे. यात त्यांनी ही कृती एका वकिलाने केल्याचे म्हटले आहे.
या घटनेसंदर्भात दिल्ली पोलिसांचे अतिरिक्त जनसंपर्क अधिकारी रंजय अत्रिश्य आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेले दिल्ली पोलीस दलाचे उपायुक्त ( डी.सी.पी.) जितेंद्र मणी यांना संपर्क केला असता त्यांनी म्हटलं आहे की या घटनेचा तपास सुरू आहे,आणि सद्यपरिस्थितीत यावर काहीही बोलता येणार नाही,असे स्पष्ट केले.
या घटनेसंदर्भात सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स-ऑन-रेकॉर्ड असोसिएशननं (एस.सी.ओ.ए.आर.ए.) एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यात त्यांनी संवेदना आणि खेद व्यक्त केला आहे.
सदर वकिलाने असंयमी आणि चुकीच्या कृतीनं न्यायालयाचा आणि देशाच्या सरन्यायाधीशांचा तसंच त्यांच्या सहकारी न्यायमूर्तींचा अपमान करण्याचा प्रयत्न केलाया गोष्टीचा एकमतानं सुप्रीम कोर्ट वकील संघाने निषेध केला.
बार अँड बेंचच्या माहितीनुसार, ” ही घटना त्या वेळी घडली जेव्हा सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठ प्रकरणांची सुनावणी सुरु होती.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,एक वकील मंचाजवळ गेला आणि बूट काढून त्याने तो न्यायाधीशांवर फेकण्याचा प्रयत्न केला.मात्र, न्यायालयात उपस्थित सुरक्षारक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करून त्या वकिलाला बाहेर काढलं.”
काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की बूट भिरकावण्यात आला तर काहींचं म्हणणं आहे की पेपर रोल फेकण्यात आला.
सकाळी सुमारे साडे अकराच्या सुमारास राकेश किशोर नामक वकिलाने कोर्ट नंबर १ मध्ये कामकाज सुरु असताना आपले स्पोर्ट्स शूज काढले आणि सरन्यायाधीश गवई यांच्यावर फेकले.
भगवान विष्णूंवर सरन्यायाधीशांनी केलेल्या टिप्पणीमुळे दुखावल्यामुळे त्याने असे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे.
१६ सप्टें.रोजी सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के.विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने मध्यप्रदेशातील खजुराहो येथील एका मंदिरात भगवान विष्णूच्या तुटलेल्या मूर्तीची दुरुस्ती आणि देखभाल करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती.
त्यावेळी खंडपीठानं म्हटलं की,हे प्रकरण न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात नव्हे,तर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अधिकार क्षेत्रात येतं.
या याचिकेला ” प्रसिद्धीसाठी दाखल केलेली याचिका, ” असं म्हणत खंडपीठानं याचिकाकर्त्याला म्हटलं की, जर तो भगवान विष्णूचा मोठा भक्त असेल,तर त्याने प्रार्थना करावी आणि थोडं ध्यान करावं.
यानंतर भगवान विष्णू मूर्तीच्या दुरुस्तीची मागणी करणाऱ्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देताना ते म्हणाले, ” आजकाल सोशल मीडियावर काहीही केलं जाऊ शकतं.परवा कोणीतरी मला सांगितलं की, तुम्ही काहीतरी अपमानास्पद वक्तव्य केलं आहे.”
” मी सर्व धर्मांवर विश्वास ठेवतो आणि सर्व धर्मांचा आदर करतो,”
सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स-ऑन-रेकॉर्ड असोसिएशननं त्यांच्या निवेदनात पुढे म्हटलं आहे की असं गैरवर्तन बार असोसिएशनच्या सदस्याकडून अपेक्षित असलेल्या वर्तनाच्या विपरित आहे.ते खंडपीठ आणि बार असोसिएशनमधील संबंध जपणाऱ्या परस्पर आदराच्या नितीमूल्यांवर हल्ला करणारं आहे.
याप्रकारचं वर्तन हे कायदा क्षेत्राच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारं आहे.तसंच ते योग्य वर्तन,शिस्त आणि संस्थेच्या विश्वासार्हतेबाबतच्या घटनात्मक मूल्यांच्या विरोधी आहे.देशाच्या सरन्यायाधीशांविरोधात वैयक्तिक स्वरुपात करण्यात आलेली कोणतीही कृती किंवा हावभाव किंवा त्यांची निंदानालस्ती करण्याचा केलेला कोणताही प्रयत्न हा देशाच्या स्वतंत्र न्यायव्यवस्थेवर केलेला थेट हल्ला आहे आणि न्यायदानाच्या व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कमी करणारा आहे.
असोसिएशनचं पुढे म्हटलं आहे की सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स-ऑन-रेकॉर्ड असोसिएशन या भ्याड आणि अपमानास्पद कृतीचा एकमतानं निषेध करतं.तसंच संपूर्ण न्यायव्यवस्थेचं वैभव, स्वातंत्र्य आणि सर्वोच्च न्यायालयाचा नि:पक्षपातीपणा राखण्यासाठी देशाच्या माननीय सरन्यायाधीशांच्या आणि संपूर्ण न्यायव्यवस्थेचं पाठीशी एकजुटीनं उभे आहोत.
असोसिएशननं धर्मनिरपेक्षता, एकता आणि बंधुभावाच्या तत्वांमधील त्यांच्या विश्वासाचा पुररुच्चार केला आहे.हीच तत्वं आपली राज्यघटना आणि बार कौन्सिलच्या सामूहिक सद्सद्विवेकबुद्धीचा पाया आहेत.असोसिएशननं कायद्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना व्यवसायिक प्रतिष्ठा जपण्याचं आणि विभाजनकारी वर्तन टाळण्याचं आणि आपण सेवा देत असलेल्या संस्थेची एकता आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याचं आवाहन केलं आहे.
सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स-ऑन-रेकॉर्ड असोसिएशन ( एस.सी.ओ.ए.आर ए.) पुढे असं मत व्यक्त करतं की सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात वर उल्लेख केलेल्या मूल्यांच्या संदर्भात स्वत:च पुढे येत पाऊल उचलावं ( सू मोटू कॉग्निजन्स ) न्यायालयाचा अपमान केल्याबद्दल योग्य ती कारवाई सुरू करावी.कारण ही कृती/हावभाव या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांवर हल्ला करत त्याचा अपमान करण्यासंदर्भातील आणि लोकांच्या नजरेत त्याची प्रतिष्ठा कमी करण्यासाठीचं विचारपूर्वक उचललेलं पाऊल आहे.
अशा घटनेतून अभिस्वांतत्र्याकडे,लक्ष वेधलं जाऊ शकतं,ज्यात या अधिकाराचा वापर करतानाच्या मर्यादांचं भान ठेवण्याची आवश्यकता असते. विशेष करून कायद्याच्या क्षेत्रातील व्यवसायिकांनी ते लक्षात ठेवलं पाहिजे.

