दीपक मोहिते,
रामनाथ गोयंका ; थोर पत्रकार व स्वातंत्र्यसैनिकाला शतशः प्रणाम,
इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्रसमूहाचे संस्थापक अध्यक्ष आणि स्वातंत्र्य चळवळीतील ज्येष्ठ नेते रामनाथ गोयंका यांचा आज स्मृतिदिन असुन पत्रकारिता क्षेत्रात तो उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होईल किंवा नाही, हे सांगता येणार नाही.कारण हल्लीची गोदी मिडिया या थोर पत्रकार व स्वातंत्र्यसैनिकाची दखल घेईल,असे वाटत नाही.
रामनाथ गोयंका यानी आणिबाणीच्या काळात सरकारशी जो लढ़ा दिला,त्याची नोंद जगभरातील देशाच्या माध्यमानी त्याकाळी घेतली होती.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यानी आपला वृत्तपत्र समूह नेटाने चालवला.सरकारने प्रसिद्धि माध्यमावर लादलेली सारी बंधने त्यानी मोठ्या धाडसाने झुगारली व आपल्या व्यवसायाशी ते आपल्या पत्रकारितेशी कायम प्रामाणिक राहिले.त्याकाळात सरकारने माध्यमांची प्रचंड गळचेपी चालवली होती,परंतु त्याला धुप न घालता गोयंका यानी जो कणखरपणा दाखवला त्यास तोड़ नाही.आज त्यांच्या धाडसाची आठवण सध्याच्या गोदी मिडियाने ठेवली तरी आपण भारतीयांनी खूप काही मिळवले,असे म्हणू शकू.पण आज आपली सारी माध्यमे सरकार व उद्योगपतींच्या पायाशी लोळण घेत असल्याचे,आपण पावलोपावली अनुभवत आहोत.काळ बदलला की क्षितिजावर परिवर्तनाची पहाट उगवत असते,असे आपण जुन्या लोकांकडून ऐकत आलो,पण सध्या सर्वत्र गडद अंधार पसरला असून क्षितिजावर पहाट उगवणे आता शक्य नाही.आज जी अघोषित आणीबाणी परिस्थिती देशात निर्माण झाली आहे,त्याला सध्याचे राज्यकर्ते जबाबदार आहेतच पण आपली गोदी मीडियाही तेवढीच जबाबदार आहे.लडाख येथे आपल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सोनम वांगचूक यांना सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून तुरुंगात डांबले,काही किरकोळ अपवाद वगळता भारतीय मिडियाने त्याविरोधात आपला आवाज उठवला नाही.आज जर रामनाथ गोयंका हयात असते तर त्यांनी आपल्या दैनिकांचे संपादकीय पान कोरे ठेवून सरकारचा निषेध केला असता.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ज्या दिवशी देशभरात आणीबाणी लादली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी गोयंका यांनी आपल्या दैनिकाच्या अग्रलखाची जागा रिकामी ठेवून सरकारचा तीव्र निषेध केला होता.गोयंका यांनी आपल्या तत्वाशी कधीही तडजोड केली नाही व आपल्या निष्ठा भांडवलशाही सरकारच्या पायाशी वाहिल्या नाहीत.अशा या थोर स्वातंत्र्यसैनिकाला त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन,

