दिपक मोहिते,
” हल्लाबोल,”
कोणाच्याही कोंबड्याच्या आरवण्याने एकदाचे उजडू द्या…
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष सध्या जागे झाल्याचे पाहायला मिळत आहे.सत्ताधारी पक्षाची मंडळी सरकारमधील आपल्या नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मागण्याची निवेदने देत सुटले आहेत.तर कालचे सत्ताधारी आता विरोधात आल्यानंतर मोर्चे काढू लागले आहेत.सदर बाब वसईकर जनतेसाठी सुखद असली तरी त्यामधून नक्की काय निष्पन्न होणार ? हे येणाऱ्या काळात वसईच्या जनतेला अनुभवायला मिळणार आहे.या सर्व घडामोडीसंदर्भात करदात्यांनी फारसे मनाला लावून घेता कामा नये.कारण हे सारे उपद्व्याप ” राजकीय कुरघोडी,” या सदरात मोडत असतात.
असो,कुणाच्याही कोंबड्याच्या आरवण्याने एकदाचे उजडू द्या,अशा निर्णयाप्रत वसई – विरारची जनता आली आहे.या उपविभागातील अंतर्गत रस्त्याची दुरावस्था पाहिल्यास गेल्या १५ वर्षात रस्ते व गटारे बांधणीवर झालेले हजारो कोटी रु.चा निधी कोणाच्या घश्यात गेला ? हे शेंबडे पोरं देखील सांगू शकेल.उशीरा का होईना,पण राजकीय पक्षांना उपरती झाली,हे ही नसे थोडके,असेच म्हणावे लागेल.सध्या विद्यमान आमदारांनी निवेदने देणे,मंत्री व संबधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणे व विविध विभागांना भेटी देण्याचे सत्र आरंभले आहे.संबधित मंत्र्याशी भेट झाल्यानंतर ” आम्ही केलं,” अशा आविर्भावात सत्ताधारी पक्षाचे अंधभक्त सध्या डंका पिटत सुटले आहेत.मंत्र्यांना निवेदने दिल्यानंतर आपल्या पदरात काय पडले ? मंजूर झालेली किती कामे सुरू झाली ? याविषयीचा लेखाजोगा त्यांनी मांडायला हवा.पण,त्यादृष्टीने कोणतीही हालचाल गेल्या अकरा महिन्यात झाल्याचे पाहायला मिळाले नाही.दुसरीकडे हातून सत्ता गेल्यानंतर आणि सध्या विरोधक म्हणून भूमिका पार पाडणाऱ्यानी या प्रदीर्घ काळात काय केले ? याविषयी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.सत्तेत असताना जर प्रभावीरित्या विकासकामे केली असती तर आज मोर्चे काढायची पाळी तुमच्यावर आली नसती.आज,तुमच्यावर जशी पाळी आली आहे,तशीच पाळी उद्या सत्ताधारी मंडळींवर येऊ शकते.निवेदने देऊन व मंत्र्याशी चर्चा करून प्रश्न सुटणार नाहीत,कारण सध्याचे सरकार हे गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे.या सरकारला समृद्धी मार्ग,शक्तीपीठ मार्ग,बुलेट ट्रेन,वाढवण बंदर व मुरबे व्यापारी बंदर अशा प्रकल्प उभारणीमध्ये इंटरेस्ट आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्याची अवस्था पाहिल्यास हे सरकार किती पाषाण हृदयाचे आहे,हे पावलोपावली अनुभवायला मिळत आहे.काल सत्तेत असलेल्याना मतदारांनी आपला इंगा दाखवला,त्यामुळे आज त्यांच्यावर मोर्चे काढण्याची नामुष्की आली आहे.पण हा मोर्चा काढण्यापूर्वी त्यांनी भूतकाळात डोकावून बघण्याची गरज आहे.तसे ते त्यांनी पाहिल्यास ते आत्मपरीक्षण ठरू शकते.या सर्व घडामोडीतून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं,अशीच करदात्यांची अपेक्षा आहे.

