दीपक मोहिते,
निवडणूक पर्व – प्रभाग क्र.२६,
वर्षानुवर्षे साथ देणारा हा प्रभाग बविआच्या हातून निसटू शकतो…
प्रभाग क्र २६ हा सुशिक्षित असा प्रभाग आहे,या प्रभागाचा आनंद नगर,स्टेला v अन्य काही परिसर व्यापारी क्षेत्र म्हणून ओळखला जातो.हा परिसर रेल्वे स्थानकाला लागून असल्यामुळे येथे व्यापार – उदिमाला सुगीचे आले आहेत,आजही ते व्यापारी वैभव टिकून आहे.
हा प्रभाग गेली अनेक वर्षे बहुजन विकास आघाडीच्या कायम पाठीशी उभा राहिला.पण सध्या तशी परिस्थिती उरलेली नाही.त्यांच्या एका बड्या नेत्याने गेली अनेक वर्षे पक्षाच्या दैनंदिन कामापासून स्वतःला दूर राखले आहे.अंतर्गत वाद व मतभेदापायी येथील नागरिकांमध्ये लोकप्रिय असलेला हा नेता गेली अनेक वर्षे राजकीय पटलावरून नाहीसा झाला आहे.त्याचा या निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.वसई रोड,माणिकपूर,विशाल नगर,दिवाणमान हा सर्व परिसर एकेकाळी बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे.पण सध्या पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले आहे.पक्षातील केवळ एका गटाचे भले होत गेल्यामुळे इतर गटात नाराजी निर्माण झाली,त्याचा परिणाम लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला आहे.गेल्या महिन्यात या भागातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये एकगठ्ठा प्रवेश केला.तसेच आणखी काही कार्यकर्ते त्याच मार्गावर आहेत.अशाप्रकारचे महाभारत घडत असूनही नेतृत्व याविषयी आत्मपरीक्षण करण्यास तयार नाही.एकनाथ शिंदे यांनी तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत उठाव केला असता,अनेक नेत्यानी उद्धव ठाकरे यांना परिस्थितीची जाणीव करून दिली होती.पण उद्धव ठाकरे यांनी या नेत्यांना ” तुम्हाला हवं तर तुम्हीही जाऊ शकता,” असे उत्तर दिले होते.त्यानंतर त्यांचा पक्ष छिन्नविच्छिन्न होत गेला.राजकारणात कधीही काही होऊ शकते,असे म्हंटले जाते,त्याचे हे उत्तम उदाहरण ठरले.या अनुभवावरून बहुजन विकास आघाडीने देखील आत्मपरीक्षण करण्याची गरज होती.पण ती वेळ आता निघून गेली आहे.विधानसभा निवडणुकीदरम्यान मनसेने त्यांना मदतीचे आश्वासन दिले होते.त्यांची वसई पूर्व भागात ( गोखीवरे,वालीव व सातीवली ) सुमारे पाच हजार मते होती,त्याबदल्यात त्यांनी महानगरपालिकेच्या चार ते पाच जागा देण्याची मागणी केली होती.पण त्यांना जागा दिल्यातर आपल्या माणसाचे काय ? असा प्रश्न उपस्थित करत ही मागणी फेटाळली गेली.त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात आ.ठाकूर याना केवळ ३ हजार १५३ मतांनी पराभव पत्करावा लागला होता.राजकारणात बदलत्या परिस्थितीनुसार दोन पावले मागे जाण्याची तयारी ठेवावी लागते.पण सतत मिळालेल्या विजयानेच अखेर बहुजन विकास आघाडीचा घात झाला.वसई रोड भागात भाजप वाढत असून त्यांची नियोजनबद्ध आखणी त्यांना या निवडणुकीतही फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.आपल्या पारंपारिक मतांवर डल्ला मारण्यात भाजप कसा यशस्वी झाला,याचा विचार पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर व्हायला हवा होता.पण तसा तो झाला नाही.
त्यामुळे या निवडणुकीतही मागच्या विजयाची पुनरावृत्ती झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
असो,या प्रभागाची लोकसंख्या ३८ हजार ९०७ इतकी आहे.या प्रभागाची भौगोलिक रचना थोडीशी विचित्र आहे.या प्रभागात आनंद नगर,अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय परिसर,उमेळगाव,माणिकपूर तलाव,एसटी आगार,पाटील आळी,जरीमरी नगर,सुयोग नगर,नौपाडा,बऱ्हामपूर,
स्टेला,राजहंस,दोस्ती,सेंट ऑगस्टीन हायस्कुल व सेंट अल्फान्सो चर्च परिसराचा समावेश आहे.या प्रभागात गुजराती व इतर भाषिकांचे प्राबल्य असल्यामुळे या प्रभागात भाजप नजरेत भरेल,अशी कामगिरी करण्याची शक्यता अधिक आहे.

