दीपक मोहिते,
सामाजिक भान,
दुर्देवी घटनेचे मार्केटिंग नको….
विरार येथील नावाजलेल्या शिक्षण संस्थेच्या संकुलात दोन दिवसांपूर्वी जो काही गैरप्रकार झाला,त्यामधील दोषींवर कारवाई व्हायला हवी,त्याविषयी कोणाचेही दुमत असता कामा नये.समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या या अपप्रवृत्तीना ठेचायलाच हवे.त्यादृष्टीने पोलीस यंत्रणा सध्या सक्रिय झाली आहे.मात्र या घटनेचे मार्केटिंग होता कामा नये.पण दुर्देवाने तसे होताना पाहायला मिळत आहे.गेली अनेक दशके विविध जाती – धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असलेल्या ऐतिहासिक नगरीमध्ये अशाप्रकारचा किळसवाणा प्रकार घडावा, ही खऱ्या अर्थाने दुर्देवी बाब आहे,आणि त्याचा निषेध करावा,तेवढा थोडाच…
पोलीस यंत्रणा,या संपूर्ण घटनेचा सखोल तपास करत आहे,आणि या घटनेतील दोषींना ते गजाआड करतील,याविषयी शंका घेण्याचे कारण नाही.मात्र या घटनेचे सोशल मिडियावर ज्या पद्धतीने प्रचार आणि प्रसार सुरू आहे,तो पाहता संशयाची पाल मनात चुकचुकु लागली आहे.विषय संवेदनशील आहे,त्यामुळे तो अत्यंत काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे.कारण,ही जी घटना ज्या शैक्षणिक संस्थेत घडली आहे,ती एक नावाजलेली शैक्षणिक संस्था असून आजच्या घडीला लाखो विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.त्यामुळे या प्रकरणी मार्केटिंग व राजकारण होता कामा नये.कोणतीही संस्था उभारताना किती कष्ट उपसावे लागतात,याची सर्वांना कल्पना आहे.पण ती मोडीत काढण्यासाठी फारसा वेळ लागत नाही.मुंबईसारख्या शहरात मिळणारे दर्जेदार शिक्षण ग्रामीण भागात उपलब्ध होणे,ही दुर्लभ बाब असून ही शैक्षणिक संस्था गेले पाव शतक शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय आहे.या प्रकरणाचा आज ना उद्या सोक्षमोक्ष लागेल,पण त्यापूर्वी संस्थेची जी बदनामी होत आहे,ती थांबली पाहिजे.घटना घडली म्हणून संस्थेला धारेवर धरणे,हे योग्य होणार नाही.कोण कसा वागतो ? तो माध्यमावर कशाप्रकारच्या पोस्ट व्हायरल करतो ? याच्याशी संस्थेचा काहीही संबंध नाही.त्यामुळे माध्यमांनी या प्रकरणी तारतम्य बाळगायला हवे.वर्षानुवर्षे सर्वधर्मसमभाव जोपासणाऱ्या ऐतिहासिक नगरीची तसेच एका नावाजलेल्या संस्थेची बदनामी होणार नाही,याची खबरदारी प्रत्येक सुजाण नागरिकाने घेतली पाहिजे.

