दीपक मोहिते,
निवडणूक पर्व – प्रभाग क्र.२४,
ख्रिस्ती व गुजराती मते निर्णायक ठरण्याची शक्यता…
या प्रभागात ख्रिस्ती, गुजराती,दाक्षिणात्य व हिंदू मतदारांचा समावेश आहे.वसई रोड विभागात हा परिसर अत्यंत गजबजलेला तसेच दिवसभरात अठरा तास व्यस्त असणारा असा प्रभाग आहे.गेली अनेक वर्षे या प्रभागाची ओळख बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला अशी आहे.तो भेदण्यासाठी यंदा भाजप जोरदार तयारी करत आहे. सर्व राजकीय पक्षाची भिस्त या प्रभागातील ख्रिस्ती व गुजराती मतदारांवर आहे.पूर्वी ख्रिस्ती समाज हा कायम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला झुकते माप देत आला,पण गेल्या काही वर्षात बहुजन विकास आघाडीने या मतपेटीवर डल्ला मारला व प्रत्येक निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली.महानगरपालिका निवडणुकीत मात्र त्यांना भाजपच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.विद्यमान आ.स्नेहा दुबे पंडित यांचे वडील विवेक पंडित यांचे ख्रिस्ती समाजामध्ये चांगले प्राबल्य असल्यामुळे ख्रिस्ती समाज काही प्रमाणात भाजपकडे वळू शकतो.भाजपची पारंपारिक वोटबँक असलेल्या गुजराती समाजाची साथ मिळण्याची दाट शक्यता आहे.ख्रिस्ती समाज हा भाजपला कधीही मतदान करत नाही,त्यामुळे विवेक पंडित यांना या निवडणुकीत प्रचंड मेहनत करावी लागणार आहे.ख्रिस्ती मते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व बहुजन विकास आघाडी या दोघांमध्ये विभागली गेली तर ते भाजपच्या पथ्यावर पडेल.
या प्रभागामध्ये वाहतूक कोंडी ही एकमेव समस्या वगळता अन्य विकासकामे प्रलंबित नाहीत.हा प्रभाग दाट लोकसंख्येचा प्रभाग असून येथे ३९ हजार ८६०
नागरिक आहेत.माणिकपूर नाक्यावर दररोज सकाळी व संध्याकाळी होणारी वाहतूककोंडी फार मोठी डोकेदुखी ठरली आहे.वास्तविक समाज उन्नती मंडळ ते बिकेसी हायस्कुल दरम्यान रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे होते.पण मतावर डोळा ठेवून हे महत्वाचे काम करण्यासंदर्भात कायम टाळाटाळ करण्यात आली.त्याचे परिणाम मात्र करदात्यांना भोगावे लागत आहेत.या प्रभागात दिवाणमान गाव,चुळणा गाव,चुळणा तलाव,कौल सिटी हेरिटेज,सन सिटी,६० फूट रस्ता,माणिकपूर नाका,माऊंट कार्मेल स्कुल,सेंट पीटर स्कुल व तुळजाभवानी गार्डन,या नागरी वसाहतीचा समावेश आहे.एकेकाळी आगरी समाजाचे प्राबल्य असलेल्या दिवाणमान भागात आता हा समाज अल्पसंख्यांक झाला आहे.बाहेरून येथे स्थायिक झालेल्या इतर समाजाने या प्रभागात आपले चांगले बस्तान बसवले आहे.या निवडणुकीत त्यांची मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.येथे बविआचे काही नेते भाजपच्या वाटेवर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे,या बातमीत तथ्य असेल तर मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर बविआ अडचणीत येण्याची शक्यता आहे.

