दीपक मोहिते,
निवडणूक पर्व -प्रभाग क्र.२२,
प्रभाग क्र.२२ मध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे,
या प्रभागात विविध समाजाचा भरणा आहे.येथे वाढत्या नागरीकरणामुळे मराठी भाषिक आता अल्पसंख्याक झाले आहेत.नव्याने निर्माण झालेल्या नागरी संकुलात विविध जाती धर्माच्या लोकांचा भरणा सर्वाधिक आहे.जलाराम बापू नगर परिसरात भलीमोठी झोपडपट्टी असून काठियावाडी व श्रमिक वर्ग या झोपडपट्टीत मोठ्या संख्येने राहतो.एकंदरीत या प्रभागात मिश्र लोकवस्ती आहे.गेल्या काही वर्षात येथे मोठ्याप्रमाणात नागरीकरण झाले.पूर्वी या भागात अनेक मिठागरे होती,पण त्याचे क्षेत्र आता कमी झाले आहे.या खारटन जमिनीची मालकी केंद्रीय सॉल्ट विभागाकडे आहे.पण,१९९० पासून मीठ व्यवसाय हळूहळू इतिहास जमा झाला. त्यामुळे या जमिनीवर बिल्डर लॉबीची वाकडी नजर आहे.पण या जमिनीची खरेदी विक्री रीतसर मार्गाने होऊ शकत नसल्यामुळे या जमिनी अद्याप सहीसलामत राहिल्या आहेत.
९० च्या दशकात नगरपरिषद व त्यानंतर महानगरपालिकेच्या काळात या परिसरात नागरिकरणाला बऱ्यापैकी वेग आला.पाणी,आरोग्य व स्वच्छता या तीन क्षेत्रात भरीव म्हणता येणार नाही,पण पुरेशी विकासकामे झाली.मात्र त्याला नियोजनबद्ध विकास असे म्हणता येणार नाही.पाण्याचा प्रश्न काही अंशी मार्गी लागला असला तरी या भागात सकाळी व संध्याकाळी होणारी वाहतूककोंडी ही या भागात राहणाऱ्या नागरिकांना डोकेदुखी ठरली आहे.या प्रभागात सलग दोन वेळा शिवसेनेच्या किरण चेंदवणकर या निवडून आल्या आहेत.त्यांचे या प्रभागात चांगले काम असून यावेळीही त्यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.या प्रभागात वसई पूर्व विभाग औद्योगिक वसाहत,आझाद नगर,जलाराम बापू नगर,एमएसइबी,मधूबन,
गोखीवरे व्हिलेज,एव्हरशाईन नगर,वसंत नगरी,कॅपिटल मॉल,आचोळे अग्निशमन केंद्र,आचोले व्हिलेज व नालासोपारा डी मार्ट परिसर या विभागाचा समावेश आहे.येथे ४१ हजार ६५८ इतकी लोकसंख्या आहे,त्यापैकी अनु.जाती – १ हजार ३९९ व अनु.जमाती – ७९२ इतकी आहे.या निवडणुकीत शिंदे गट या प्रभागावर दावा करण्याची शक्यता आहे.तसे झाल्यास या प्रभागात बविआ,शिवसेना ( उबाठा ) व शिवसेना ( शिंदे गट ) अशी तिरंगी लढत होईल,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

