दीपक मोहिते,
जिल्हा प्रशासन व वसई विरार मनपा यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव,
पालघर जिल्ह्यात काल रेड अलर्ट असताना पहाटे पाचच्या सुमारास विरार पूर्वेस चंदनसार विभागातील बरफपाडा येथे अचानक ५० घरामध्ये पाणी शिरले व एक घर पाण्याचा प्रवाहात वाहून गेले.या दुर्घटनेची वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नैसर्गिक आपत्ती निवारण विभागाला थांगपत्ता नव्हता. तर जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात या घटनेचा साधा उल्लेखही करण्यात आला नाही.

या घटनेवरून महानगरपालिका व जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये बिलकुल समन्वय नसल्याचे दिसून आले आहे.या नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या ३० कुटुंबाना एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदतीचा हात पुढे करत ३० चटया व रेशनिंग किटचे वाटप केले.
काल पालघर जिल्ह्यात विरार पूर्व भागातील चंदनसार भागात ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत मनुष्यहानी झाली नाही.या दोन्ही विभागाच्या निष्क्रियते विरोधात स्थानिक रहिवाश्यानी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सदर घटनेची माहिती वसई विरार शहर महानगरपालिकेला मिळाली कि नाही,हे कळायला मार्ग नाही.तशी मिळाली नसल्यास महानगरपालिकेची नैसर्गिक आपत्ती निवारण यंत्रणा कशा पद्धतीने काम करते ? हे स्पष्ट झाले आहे.दुसरीकडे काल जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात घडलेल्या दुर्देवी घटनाचा आढावा घेऊन एक पत्रक प्रसिद्धीस दिले होते,त्यामध्ये या घटनेचा साधा उल्लेख नाही.यावरून या दोन्ही यंत्रणा आपत्ती निवारणाचे काम कसे करत असतात यावर प्रकाश पडला आहे.याप्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी करण्यात येत आहे.

