दीपक मोहिते,
निसर्गाची अवकृपा,
पिडीत शेतकऱ्यांना आधाराची गरज,अन्यथा राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणार…
यंदा पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला असून मराठवाडा,रायगड व पालघर जिल्ह्यातील शेती व बागायतीचे होत्याचे नव्हते झाले आहे.पावसाचा रुद्रावतार व शेतीची झालेली नासाडी,लक्षात घेऊन सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करायला हवा,पण आपले सरकार हे सध्या बघ्याच्या भूमिकेत आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आता आत्महत्येच्या मार्गावर जाईल,अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.केंद्र व राज्य सरकारने राज्याच्या ग्रामीण भागात निरीक्षण पथके पाठवून तातडीने नुकसानीची पाहणी करावी व लवकरात लवकर पिडीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी,अशी मागणी करण्यात येत आहे.
यंदा मे महिन्यात सुरू झालेला पाऊस अद्याप थांबायचे नाव घेत नाही,त्यामुळे बळीराजा पार धायकुतीला आला आहे.कापणीला आलेली पीके डोळ्यादेखत आडवी झाल्याचे पाहून राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या आहेत.मराठवाडा उपविभागात तर शेतकऱ्यांची शेतीच्या शिवारासह घरेदारे देखील वाहून गेली आहेत.या पिडीत शेतकऱ्यांना आता मदतीची गरज आहे.झालेल्या नुकसानीची पाहणी,पंचनामे व नुकसानभरपाई इ.कामे वेळेवर झाली तरच हा शेतकरी पुन्हा उभा राहू शकतो,अन्यथा त्याच्यासमोर आत्महत्या करणे,हाच एकमेव पर्याय आहे.राज्यात कृषी क्षेत्राचे झालेले नुकसान लक्षात यंदा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.खरीप पिकांची वाताहत झालीच आहे,पण पुढील महिन्यात सुरू होणारा रब्बी हंगाम धोक्यात येण्याची भिती शेतकरी व्यक्त करण्यात येत आहे.

