दीपक मोहिते,
निवडणूक पर्व – प्रभाग क्र.२१,
परप्रांतीय मतदारांवर भाजपची भिस्त…
सदर प्रभाग हा वसई व नालासोपारा पूर्व भागात पसरला असून बाहेरून येथे स्थायिक होणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे.या प्रभागात खारटन जमिनीचे क्षेत्र प्रचंड असूनही १९८० च्या दशकात येथे मोठ्याप्रमाणात बांधकाम परवानग्या दिल्या गेल्या.त्यामुळे अल्पावधीत या प्रभागातील लोकसंख्या गगनावर पोहोचली.अनेक नागरी वसाहती सरसकट खारटन जमिनीवर उभ्या राहिल्या.या वसाहतीमध्ये राहायला आलेल्या नागरिकांना १९८० ते २०००,अशी दोन दशके नागरी सुविधाअभावी अनेक यातना सहन कराव्या लागल्या.२००० साली सुर्या पाणीप्रकल्पाच्या टप्पा – १ मधून पाणी मिळू लागल्यानंतर मात्र या नागरी संकुलातील रहिवाश्याना काही अंशी दिलासा मिळाला.
त्यानंतरच्या काळातही सिडको प्राधिकरणाने बांधकाम परवानग्या देण्याचा सपाटा सुरूच ठेवल्यामुळे नागरी संकुले वाढत गेली व रहिवाश्याना पुन्हा पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले.मानवनिर्मित या अस्मानी संकटाला सामोरे जाण्यासाठी या रहीवाश्याना कायम टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागला.एकदिवस आड मिळत असतानाही त्यांना पाण्याची बिले मात्र पूर्ण महिन्याची भरावी लागत होती.एकीकडे मनपाची भरमसाठ बिले,तर दुसरीकडे टँकरवाल्याकडून होणारी लूट,अशा कात्रीत येथील नागरिक सापडले.आज काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.
गेली अनेक वर्षे या प्रभागात काही प्रमाणात शिवसेना व बहुजन विकास आघाडीचे प्राबल्य राहिले.बाजूच्या प्रभागात सक्रिय असलेले बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक किरण भोईर हे अंतर्गत गटबाजीला कंटाळून भाजपमध्ये दाखल झाले.त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव करण्यासाठी बहुजन विकास आघाडीने जंग जंग पछाडले,पण त्यांना ते शक्य झाले नाही. या प्रभागात मनसेही एकदा बाजी मारली होती,त्यानंतर मात्र त्यांना यश मिळू शकले नाही.या प्रभागात गोखीवरे तलाव,फादरवाडी,राम रहीम नगर,चिंचपाडा,
जानकीपाडा,मकालपाडा,विद्याविकासनी स्कुल परिसर,सेंट अँलॉयसीस स्कुल परिसर,आचोळे गाव परिसर,वैतीवाडी,
आचोळे पोलीस ठाणे परिसर,आचोळे डोंगरी व संकेश्वर नगर इ.चा समावेश आहे.प्रभागात सुमारे ४५ हजार ६९१ इतकी लोकसंख्या आहे.या प्रभागात बहुजन विकास आघाडी व भाजप अशी सरळ लढत होण्याची शक्यता आहे.बाहेरून येथे स्थायिक झालेले मतदार यावेळी कोणत्या पक्षाला डोक्यावर घेतात,यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.गुजराती,उत्तर भारतीय,बाहेरून स्थायिक झालेला ख्रिस्ती व दाक्षिणात्य समाज लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत भाजप सोबत जातो का ? हे पाहायला लागेल.

