दीपक मोहिते,
निवडणूक पर्व,
वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुका ; वेळीच सावध व्हा,अन्यथा कपाळमोक्ष ठरला आहे…
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो,त्यामुळे काही राजकीय पक्ष जुळवाजुळवीच्या कामाला लागले आहेत.जिल्ह्यात वसई-विरार शहर महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे,जी राजकीय पक्षाची आर्थिक गरज भागवू शकते.त्यामुळे ही महानगरपालिका आपल्या ताब्यात यावी,यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपले देव पाण्यात टाकून बसले आहेत.पाण्यात टाकलेले देव कोणाला पावतात,हे येत्या जाने.महिन्यात स्पष्ट होणार आहे.
या महानगरपालिकेच्या ११५ जागांवर निवडणुका लढवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान १ कोटी रु.चा निधी आवश्यक आहे.त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष जमेल त्या मार्गाने गोळा करण्याच्या कामात गर्क आहे.अनधिकृत बांधकाम व्यवसायिक,ठेकेदार,
विकासक,मनपाचे वरिष्ठ अधिकारी,उद्योजक व अन्य विभागाचे शासकीय अधिकारी हे सारे राजकीय पक्षाचे आर्थिक स्रोत आहेत.वसई विरार शहर महानगरपालिका ही आर्थिक गैरव्यवहार, विकासकामासंदर्भात संवेदनशील नसणे व लोकांच्या कामाशी देणेघेणे नसलेली उभ्या महाराष्ट्रातील एकमेव अशी महानगरपालिका आहे.ही महानगरपालिका आपल्या पंखाखाली कायम राहावी,यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाची दुर्दम्य इच्छाशक्ती असते.त्यामुळे आगामी निवडणूक प्रत्येक राजकीय पक्षासाठी जीवन मरणाची लढाई आहे.ती आपल्याला जिंकावीच लागेल,अशा इर्षेने राजकीय पक्ष रिंगणात उतरतील.निवडणूक ही जिंकण्यासाठीच असते,हरण्यासाठी कोणी निवडणूक लढवत नसतो.त्यामुळे या महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत रोमहर्षक अशी होणार आहे.
भाजप,या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरण्याच्या तयारीत आहे.महायुती असली तरी वसई – विरार क्षेत्रात शिवसेना ( शिंदे गट ) व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) यांना सोबत घेऊन या निवडणुका लढवेल,अशी शक्यता फार कमी आहे.शिंदे गटाकडे पंधरा जागा लढवण्या इतके उमेदवार नाहीत,त्यांची या तालुक्यात ताकद अगदी नगण्य आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था देखील अत्यंत बिकट आहे,त्यांना एकही जागा पण लढवणे शक्य नाही.एकसंघ असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसला गेली २५ वर्षे या तालुक्यात आपले बस्तान बसवता आले नाही.आज विभक्त झाल्यानंतरही या दोन्ही पक्षाची अवस्था असून नसल्यासारखी आहे.त्यामुळे ही निवडणूक भाजप,बविआ व महाविकास आघाडी ( शिवसेना व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ) अशा तीन पक्षात होण्याची शक्यता आहे.शिवसेना ( उबाठा ) व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोघांकडे समर्थ नेतृत्व नसल्यामुळे हे दोन्ही पक्ष ही निवडणूक प्रभावीपणे लढवू शकणार नाहीत.त्यामुळे भाजप व बहुजन विकास आघाडी,या दोघांमध्ये सरळ लढत होण्याची शक्यता आहे.या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसापासून विकासकामांसंदर्भात सोशल मिडियावर पोस्ट वॉर सुरू केले आहे.बहुजन विकास आघाडीच्या काही इच्छुक उमेदवारांनी रस्त्याची व विजेची कामे सुरू असताना कामाच्या ठिकाणी उभे राहून सेल्फी काढण्याचे जे सत्र आरंभले आहे,त्याची सर्वत्र थट्टामस्करी होत आहे.पूर्वी जर या विकासकामासंदर्भांत संवेदनशील राहिला असता तर ही पाळी आली नसती,अशी खमंग चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.दुसरीकडे भाजपमध्येही सारं काही आलबेल आहे,असे वाटत नाही.विकासकामांचे श्रेय घेण्यावरून प्रचंड स्पर्धा सुरू झाली आहे.त्यामधून नक्की काय साध्य होणार आहे ? हे त्या परमेश्वरालाच माहीत.त्यांचे विरोधक,हे भाजपकडे महापौरांचा चेहरा कोण ? अशी सतत विचारणा करत असतात.पण त्यांचे हे विचारणे योग्य असले तरी पक्षात नव्याने दाखल झालेल्या एक नेत्याला या पदाची बिदागी मिळू शकते.तसेच अनुभवी उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी भाजप निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला की बहुजन विकास आघाडीचे अनेक माजी नगरसेवक व नगरसेविकाना आपल्या गळी लावण्याच्या तयारीत आहेत.बहुजन विकास आघाडीच्या दोन बड्या नेत्यांना कोंडीत पकडून त्यांना वश करण्याचे प्रयत्न आतापासून सुरू झाले आहेत.त्यासाठी बहुजन विकास आघाडीतील एक अदृश्य शक्ती भाजपला चांगले सहकार्य करत आहे.भाजपला ही निवडणूक जिंकण्यासाठी फोडाफोडीच्या राजकारणाचा आधार घ्यावा लागणार आहे.दुसरीकडे गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतरही त्यांचे बहुजन विकास आघाडीचे वरिष्ठ नेते बोध घेण्यास तयार नाहीत.पुन्हा त्याच त्याच चेहऱ्यावर त्यांनी भिस्त ठेवली आहे.जुन्याना पुन्हा उमेदवारी दिल्यास भाजपचे चांगलेच फावणार आहे.भाजपने ८० ते ९० जागा जिंकण्यावर आपला फोकस ठेवला आहे.बहुजन विकास आघाडीने नवीन चेहऱ्यांना संधी दिली नाही तर या निवडणुकीतही त्यांचा कपाळमोक्ष हा ठरलेला आहे.गेल्या पंधरा वर्षात लोकांच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या माजी नगरसेवकांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यानी या निवडणुकीत खड्यासारखे दूर केले तरच त्यांचा पक्ष भाजपच्या आक्रमणाला काही प्रमाणात यशस्वीपणे सामोरा जाऊ शकेल.

