दीपक मोहिते,
जिल्हा परिषद / पंचायत समिती,रणसंग्राम जव्हार तालुका,
जव्हार तालुका ; सरकारचे तालुक्याच्या विकासासंदर्भात अक्षम्य दुर्लक्ष,
ज्या तालुक्याच्या नावाने आता नवीन जिल्हा स्थापन होणार आहे,असा हा जव्हार तालुका निसर्गरम्य तालुका आहे.तालुका डोंगर माथ्यावर वसला असल्यामुळे येथील वातावरण हे महाबळेश्वरच्या तोडीचे आहे,त्यामुळे या परिसराला मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते.मात्र गेल्या काही वर्षात या तालुक्यात नागरीकरणाला प्रचंड वेग आला व या तालुक्याचा चेहरा मोहरा पार बदलून गेला.या परिसराला पर्यटनाचा दर्जा देण्यात यावा,अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून लावून धरली आहे.पण त्याविषयी सरकार पातळीवर कोणतीही हालचाल होऊ शकली नाही.दरम्यान तालुक्यात बांधकामांना चांगलाच वेग आला.जव्हार नगरपरीषदेच्या माध्यमातून शहरी तर जिल्हा परिषद/ पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा प्रशासकीय गाडा चालवण्यात येत असतो.एकीकडे लोकसंख्या वाढीचा प्रचंड रेटा तर दुसरीकडे नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा,अशा कात्रीत हा तालुका सापडला आहे.
हा तालुका डोंगराळ तसेच जंगलपट्टी अशा दोन भागात विभागला गेल्यामुळे येथे कारखानदारी व व्यापार उदिमामध्ये बिलकुल वाढ होऊ शकली नाही.त्यामुळे रोजगार,शिक्षण,आरोग्य,
कृषी क्षेत्र बाळसे धरू शकले नाही.येथील स्थानिक भूमिपूत्रांचा मुख्य व्यवसाय हा भातशेती असून त्यावर हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.तालुका आदिवासी बहुल असल्यामुळे आर्थिक निधी मोठ्याप्रमाणात दिला जातो.पण तो कारणी लागत नाही.२०१४ साली नव्याने पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली,त्यावेळी जव्हारवासीयांनी वाडा,मोखाडा,विक्रमगड व जव्हार,अशा चार तालुक्याचा वेगळा जव्हार जिल्हा निर्माण करा,अशी मागणी केली होती.पण सरकारने ती फेटाळून लावली.आता अकरा वर्षानंतर सरकारला उपरती झाली व आता अशाप्रकारचा नवा जिल्हा स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे.जिल्ह्यात २४ वावर,२५ विनवळ,२६ जव्हार ग्रामीण व २७ झाप,असे चार गट असून त्याअंतर्गत पंचायत समितीचे आठ गण आहेत.गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारल्यामुळे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.तसेच एकनाथ शिंदे गटाचे नेते निलेश सांबरे यांनीही आपल्या जिजाऊ या सामाजिक संस्थेने शिक्षण व आरोग्य क्षेत्रात आपले चांगले बस्तान बसवले आहे.त्यामुळे शिंदे गट चार पैकी दोन गटावर दावा करण्याची शक्यता आहे.येथे महाविकास आघाडी देखील निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) व शिवसेना ( उबाठा ) हे तीन पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरतील.तालुक्याचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.कुपोषण,पाणीटंचाई,अवकाळी पाऊस,एसटी सेवा,बदलते हवामान,रोजगार,निरक्षरता व जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडणे व स्थानिकांचे दरडोई उत्पनात होत असलेली घसरण,अशा विविध समस्यांनी त्रस्त असलेले येथील मतदार या निवडणुकीत कोणाच्या पारड्यात आपल्या मताचे दान टाकतात,हे पाहावे लागणार आहे.

