दीपक मोहिते,
निवडणूक पर्व – प्रभाग क्र.२०,
प्रचंड महसूल देणारा प्रभाग,पण बकाल,
या प्रभागामध्ये अनेक औद्योगिक वसाहती असून हजारो तरुणांना येथे रोजगार उपलब्ध होत असतो.पण या प्रभागात स्थानिक नागरिक व चाकरमान्यांना दररोज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.औद्योगिक वसाहतीमध्ये धड रस्ते नाहीत,साफसफाईची कामे वेळेवर होत नाहीत,विस्कळीत परिवहन सेवा व रिक्षाचालकांचा मनमानीपणा,आदी कारणामुळे सर्वसामान्य नागरिकांची अवस्था ” भीक नको,पण कुत्रं आवर,” अशी झाली आहे.दर पावसाळ्यात तर या प्रभागातील नागरिकांचे हाल कुत्रे खात नाही.नियोजनशून्य औद्योगिक वसाहती स्थापन झाल्यामुळे या प्रभागाला एकप्रकारचा बकालपणा आला आहे.या वसाहतीमधील हजारो कारखान्याकडून महानगरपालिकेला मालमत्ताकराच्या रूपाने प्रचंड महसूल मिळतो,पण त्या बदल्यात त्यांना पुरेशा नागरी सुविधा उपलब्ध होत नाहीत.
येथील औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखान्यांनी अंतर्गत अनधिकृत बांधकामे मोठ्याप्रमाणात केली आहेत.ही सर्व अनधिकृत बांधकामे धोकादायक बनली आहेत.महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग अनेक प्रभागातील अनधिकृत इमारती व चाळीवर तोडक कारवाई करते,पण औद्योगिक वसाहतीमधील अनधिकृत बांधकामावर कधी कारवाई केल्याचे ऐकिवात नाही.या मागे काय गौडबंगाल आहे,सांगायला नको.सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवून झालेली अनधिकृत बांधकामे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या नजरेस कशी पडत नाही,हा प्रश्न वर्षानुवर्षे अनुत्तरीतच आहे.नगरसेवक देखील या गंभीर विषयी संवेदनशील नाहीत.त्यामुळे या प्रभागातील सर्वच्या सर्व वसाहतींना बकालपणा आहे.या औद्योगिक वसाहती रोजगार उपलब्ध करत असले तरी त्यांना लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार त्याना कोणी दिला.नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्ये या भागातील अनेक औद्योगिक व नागरी वसाहती पाण्याखाली गेल्या होत्या.पण महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा कुठेच पाहायला मिळाली नाही.महानगरपालिका प्रशासनाने येथील नागरिक व चाकरमान्यांना या नैसर्गिक संकटाच्या वेळी वाऱ्यावर सोडले होते.येथील कारखान्यामध्ये व्यवस्थापन, कामगार कायदे सरसकट धाब्यावर बसवत कामगारांची पिळवणूक करत असतात.कामगारांवर आठ तासाऐवजी बारा तासाची ड्युटी लादून हे कारखानदार मानवी हक्क व अधिकाराची पायमल्ली करत असतात,पण औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय,या गैरप्रकाराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करते.
असो,हा प्रभाग क्षेत्रफळात मोठा असला तरी येथे लोकसंख्या कमी आहे.इतर प्रभागातील लोकसंख्या सरासरी ४१ हजाराच्या घरात आहे,तर या प्रभागात ती ३८ हजार ७३९ इतकी आहे.त्यापैकी अनु.जाती – २ हजार ११७ तर अनु.जमाती – ४ हजार ३२७,इतकी आहे.उद्योगधंद्याचे जाळे पसरलेल्या या प्रभागात वालीव,सातीवली,कुवरापाडा,गोलानी नाका,वसई पूर्व भोईदापाडा,राजावली,
सुरक्षा स्मार्ट सिटी,मधूबन डोंगरी,रेंज नाका,तारकेनगर,जयनगर,स्वामी समर्थ नगर,नाईक पाडा,बर्माशेल पेट्रोल पंप,वालीव विभागीय कार्यालय,वाघरलपाडा,
केळीचा पाडा व मंगोली पाडा,या परिसराचा समावेश आहे.या प्रभागामध्ये राजावली,वाघरालपाडा,
नाईक पाडा,तारके नगर व केळीचा पाडा,या परिसराचा समावेश आहे.हे सारे पाडे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अनधिकृत चाळी बांधकाम व्यावसायिक व चाळमाफियाना जणू आंदणच दिले आहेत.तसेच या परिसरात नामचीन गुंडाचा सतत राबता असतो.त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.

