दीपक मोहिते, ” वाढती गुंडगिरी, ” त्र्यंबकेश्वरच्या टोलवरील गुंडाची दहशत,पत्रकारांना जबर मारहाण,
त्र्यंबकेश्वर येथे टोल वसुली करणाऱ्या गुंडांकडून पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करावा,तेवढा थोडाच,म्हणावा लागेल. याप्रकरणी राज्याच्या गृहखात्याने हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी सर्वत्र करण्यात येत आहे.याप्रकरणी सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये, अशी मागणी राज्यातील पत्रकारांच्या विविध संघटनानी केली आहे. त्र्यंबकेश्वर येथे साधूमहंताची आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक होती,त्या बैठकीचे कव्हरेज करण्यासाठी नाशिक येथील काही पत्रकार त्र्यंबकेश्वर येथे आले होते. त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रवेश शुल्क भरावे लागते.मात्र हे पत्रकार येथे आल्यानंतर त्यांना टोलवरील कर्मचाऱ्यांनी त्याना अडवले व टोल भरावा लागेल,असे सांगितले.
त्यावरून पत्रकार व टोलच्या कर्मचाऱ्यामध्ये चांगलाच वाद झाला.आम्ही पत्रकार आहोत, आणि बातमी कव्हर करण्यासाठी आलो आहोत.तर आम्ही टोल कशासाठी भरायचा ? असा प्रश्न त्यांनी या कर्मचाऱ्यांना विचारला.त्यामुळे वादाला तोंड फुटले.टोलवरील कर्मचारी हे पत्रकारांचे म्हणणे ऐकायला तयार नव्हते.टोलवरील कर्मचाऱ्यांचा उद्दामपणा वाढत असल्याचे पाहून कंटाळलेल्या पत्रकारानी वरिष्ठांना फोन लावला.फोनवरून बोलणे सुरु असतानाच वसुली करणाऱ्या गुंडांनी उपस्थित असलेल्या पत्रकारांना मारहाण करायला सुरूवात केली.या मारहाणीमध्ये पाच पत्रकार जखमी झाले असून त्यापैकी एका पत्रकारावर त्र्यंबकेश्वर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.पण यापूर्वी प्रशासनाकडून आलेले अनुभव लक्षात घेता कारवाई होण्याची शक्यता वाटत नाही.

