दीपक मोहिते,
” निवडणूक खबरबात,”
बविआ व महाविकास आघाडी यांचे एकत्र येणे,भाजपच्या पथ्यावर पडणार…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या हालचालींना वेग आला आहे.महायुतीमध्ये अंतर्गत वाद उफाळून आले असले तरी महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेले शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) व भाजप सावध भूमिका घेत आहेत.कोणत्याही परिस्थितीत सोन्याची अंडी देणारी महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी हे दोन्ही पक्ष सध्या जपून पावले टाकत आहे.भाजप मात्र अधून मधून स्वबळाचा नारा देत लोकांचा कल कुठे आहे ? याचा अंदाज घेत असतो.लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे भाजपमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे.वसई व नालासोपारा या दोन्ही विधानसभा मतदारसंघात मिळालेले मताधिक्य लक्षात घेऊन त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा आग्रह धरला आहे.पण पक्षाचे राज्यस्तरीय नेते याविषयी मौन बाळगून आहेत.

सध्या भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असून येत्या दोन महिन्यात त्याला चांगलाच वेग येणार आहे.बहुजन विकास आघाडीच्या अनेक नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचा पक्ष खिळखिळा करण्याचे वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्न आहेत.बहुजन विकास आघाडीचे अनेक माजी नगरसेवक भाजपच्या विद्यमान आमदारांच्या संपर्कात आहेत.या दोन्ही विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाची ताकद असून नसल्यासारखी आहे.त्यामुळे त्यांना दहाच्या वर जागा देणे,चुकीचे ठरेल,असे अनेक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.तसेच सत्तेत शिंदे गट वाटेकरी होता कामा नये,यासाठी राज्यस्तरीय नेतेही सध्या चाचपणी करत आहेत.येत्या दोन महिन्यात अन्य पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्यामुळे,
तिकीटवाटपाचा प्रश्न अधिक जटील होऊ शकतो.त्यामुळे पक्षश्रेष्टीने ही निवडणूक स्वबळावर लढवावी,अशी अपेक्षा भाजपचे कार्यकर्ते तसेच इच्छुक उमेदवार खाजगीत व्यक्त करत आहेत.
दुसरीकडे बहुजन विकास आघाडीला आपल्या समवेत घेण्यासाठी महाविकास आघाडीचे मूठभर नेते प्रयत्नशील आहेत.पण त्यांना सोबत घेण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तयार नाहीत.तसेच भारतीय काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्तेही फारसे उत्सुक नाहीत.तसेच या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना सोबत घेतल्यास ते किमान तीस ते चाळीस जागांवर दावा करतील व ते बहुजन विकास आघाडीला परवडणारे नाही.तसेच हिंदी भाषेची सक्ती या विषयावर ठाकरे बंधूनी घेतलेली ताठर भूमिका भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला परवडणारी नाही.या निवडणुकीत गुजराती,मारवाडी व उत्तर भारतीय समाज,भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकतील.त्यामुळे बहुजन विकास आघाडीसह महाविकास आघाडीतील घटक पक्षाला त्याचा जबर फटका बसू शकतो.ही सर्व शक्यता लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष याविषयी सावध भूमिका घेत आहे.यापूर्वी या महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने बहुजन विकास आघाडीसोबत युती केली होती.पण त्यांना देण्यात आलेल्या जागांवर बहुजन विकास आघाडीने आपल्या उमेदवारांना बंडखोरी करायला लावून काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव घडवून आणला होता.तो कटू अनुभव गाठीशी असल्यामुळे अनेक काँग्रेसजन बविआशी शय्यासोबत ” नको रे बाबा,” अशा निर्णयाप्रत आले आहेत.शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा वसई तालुक्यात मागमूस नसल्यामुळे त्यांचा पक्ष या निवडणुका लढवण्याच्या फंदात पडणार नाहीत.उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही या निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करता येणार नाही,कारण त्यांच्याकडे सध्या सक्षम नेतृत्वाचा अभाव आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली असली तरी ती भाजपच्या विजयी खासदाराच्या मताधिक्याच्या आसपास फिरकणारी नव्हती.तर नालासोपारा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचे छप्परच उडून गेले होते.त्यामुळे या निवडणुकीतही भाजप सरस कामगिरी करेल,अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

