दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
अपप्रवृत्तीच्या लोकांना वेळीच दूर करा,अन्यथा…
सार्वजनिक जीवनात वावरताना नेतेमंडळींनी सामाजिक भान राखण्याची गरज असते,पण हल्ली महायुतीच्या नेत्यांना त्याच्याशी वावडे असल्याचे आजवर घडलेल्या अनेक प्रकरणावरून सिद्ध झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी भाजपचे जत विधानसभेचे आ.गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली.त्यांच्या या टिकेनंतर राज्यभरात त्याचे जोरदार पडसाद उमटले.ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली.त्यानंतर फडणवीस यांनी अतिशय सौम्य शब्दात पडळकर याना ” अशाप्रकारची टीका करणे,योग्य नाही व यापुढे असे घडता कामा नये,” असे स्पष्ट केले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले त्यावरून त्यांनी दिलेल्या ” समज,” या शब्दाच्या वापरातून त्यांना काय अभिप्रेत होते ? हे कळायला मार्ग नाही.वास्तविक त्यांनी आपल्या हिंदू संस्कृतीला मूठमाती देणाऱ्या पडळकर यांना या प्रकरणी ” खडे बोल,” सुनावण्याची गरज होती.” पडळकर,तुमचे हे वागणे भाजपच्या संस्कृतीमध्ये बसत नाही,त्यामुळे,या पुढे असे वागलात तर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करेल,अशाप्रकारची तंबी द्यायला हवी होती.त्याऐवजी फडणवीस यांनी माध्यमांना दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेमध्ये ” पडळकर,हे युवा आमदार असून ते उभरते नेतृत्व आहे,ते आपल्या वागण्यात बदल करतील,असे म्हंटले.त्यामुळे पडळकर यांच्या वागण्याला भाजपचा छुपा पाठिंबा असावा,असे दिसून येते.
विरोधकांना नामोहरम करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ” फडणवीस टोळी,” या नावाने टोळी उभारली आहे.या टोळीमध्ये गोपीचंद पडळकर,नितेश राणे,राम कदम,अमित साटम,मोहोक कंबोज,प्रवीण दरेकर,प्रसाद लाड,हे सदस्य म्हणून कायम वावरत असतात.दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील ताळतंत्र सोडून वक्तव्ये करण्यात आघाडीवर असतात.समोरच्या गर्दीकडून टाळ्या मिळवण्यासाठी ते अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बेताल वक्तव्ये करत असतात.त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटले की ते आजाराचे नाटक करत तीन ते चार दिवस गायब होत असतात.अनेकदा तर त्यांच्यावर दिलगिरी व्यक्त करण्याची व माफी मागण्याची पाळी आली आहे.त्यांनीही अशा अनेक जणांना पोसले आहे,त्यामध्ये अमोल मिटकरी यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल.शिंदे गटाच्या टोळीमध्ये संजय शिरसाठ,संजय गायकवाड व अन्य काही जण सामील आहेत.आपल्या नेत्यांची भलामण करताना ही मंडळी ज्या पद्धतीने वागत असतात,याचा विचार त्यांना निवडून देणाऱ्या जनतेने आता करायला हवा.समाजा – समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना हाताशी धरून उपद्व्याप करणारी ही मंडळी,आज ना उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांना अडचणीत आणणार आहेत.तशी वेळ त्यांनी स्वतःवर येऊ नये,यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच भानावर येण्याची गरज आहे व त्यासाठी अशा अपप्रवृत्तीच्या लोकांना त्यांनी दूर सारले पाहिजे..

