दीपक मोहिते,
निवडणूक पर्व – प्रभाग क्र.१५,
प्रभागात वाहतूककोंडी व अनधिकृत फेरीवाल्यांचा उच्छाद,नागरिक त्रस्त..
नालासोपारा शहराच्या पूर्वेस असलेल्या या प्रभागात गुजराती व उत्तर भारतीय समाजाचे चांगलेच प्राबल्य आहे.या प्रभागात व्यापारउदीमाचे चांगले जाळे असून लहानमोठ्या हजारो अनधिकृत फेरीवाल्यांचा उदरनिर्वाह त्यावर चालतो.दुकाने कमी आणि अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट अधिक असा हा परिसर आहे.रेल्वे स्थानक परिसरात दररोज सकाळ व संध्याकाळी होणारी वाहतूककोंडी ही येथील नागरिकांच्या पाचवीला पुजली आहे.या भागातील पदपथावर ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे धाडस ना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये आहे ना पोलिस यंत्रणेमध्ये आहे.आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना आपली वाहने बाहेर काढताना तारेवरची कसरत करावी लागते.या शहरात अनधिकृत रिक्षा व फेरीवाल्यांची संख्या आजच्या घडीला हजारोच्या घरात पोहोचली आहे.या शहरात वाहतूक पोलिस असून नसल्यासारखे आहेत.दर आठवड्याला एन्ट्री ( ठरविक रक्कम ) दिली की तुम्ही स्वातंत्र्यपूर्वीची वाहने देखील आरामात रस्त्यावर आणू शकता,या सर्व बजबजपुरीमुळे या शहराला बकालपणा आला आहे.यावर नियंत्रण आणणे,आता शक्य नाही,कारण परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.या परिस्थितीला सारे राजकीय पक्ष पक्ष व पोलिस जबाबदार आहेत.
असो,या प्रभागात ४५ हजार ५३४ मतदार असून त्यापैकी २ हजार ६३४ मतदार हे अनु.जाती तर अनु.जमातीचे ८१७ मतदार आहेत.काही किरकोळ जागाचा अपवाद वगळता या विधानसभा क्षेत्रातील बहुतांश प्रभागावर बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व राहिले.आजवर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत चार ते पाच जागा शिवसेनेच्या पदरात पडत असतात.पण गेल्या पाच वर्षात भाजपने या सर्व प्रभागात बऱ्यापैकी मुसंडी मारली आहे.शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेची प्रचंड हानी झाली.आजच्या घडीला पक्षाकडे दमदार नेतृत्वाचा अभाव आहे.त्याच सुमारास बहुजन विकास आघाडीचे पंकज देशमुख यांनी सेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी विविध उपक्रम राबवण्याचा धूमधडाका उडवून दिला होता.त्यामुळे भयभीत झालेल्या जुन्या नेत्यांनी त्यांच्या विरोधात कटकारस्थाने करत त्यांना सेना सोडायला लावली.त्यानंतर त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला.पण त्यांची या पक्षातही डाळ शिजू शकली नाही.विद्यमान आ.राजन नाईक व त्यांचा समर्थक गट,त्यांना फारसा जवळ करत नाही.पंकज देशमुख हे आगामी विधानसभा निवडणुकीत आपले स्पर्धक ठरू शकतात,याची राजन नाईक यांना भिती असल्यामुळे नाईक व त्यांचे समर्थक त्यांना भाजपच्या सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर ठेवत असतात.सेनेत असताना त्यांना जुने व नवे,अशा वादाला सामोरे जावे लागले होते,भाजपमध्येही त्यांना सध्या तशाच परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे या पक्षात ते किती काळ टिकतील ? हे सांगणे जरा कठीणच आहे.
प्रभाग क्र.१५ क्षेत्रफळात कमी असला तरी मतदारांची संख्या मात्र लक्षणीय आहे.दुबे कंपाऊंड, सनशाइन गार्डन, अलकापुरी,झालावाड,
मजिठिया पार्क,संयुक्त नगर,न्यू कपोल नगर,विवा यशवंत टाऊनशीप,नादब्रह्म,चंदन नाका परिसर,आचोळे तलाव,तलाठी ऑफिस,बापा सीताराम मार्केट,सनशाईन पोलीस चौकी व सूर्य कीर्ती नगर या नागरी वसाहतीचा या प्रभागात समावेश आहे. गुजराती व उत्तर भारतीय समाजाचे प्राबल्य लक्षात येथे या प्रभागात भाजप बाजी मारण्याची शक्यता अधिक आहे.

