दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
तरीही समुद्रकिनारे अस्वच्छ का ?
काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपचे मंत्री,खासदार,आमदार,
पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देशभरातील समुद्रकिनाऱ्यावरील कचऱ्याची साफसफाई करून साजरी केली.प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या नेत्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दरवर्षी समुद्रकिनारी असे साफसफाईचे उपक्रम राबवत असतात.आपल्या नेत्याविषयी असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी हा सारा अट्टाहास असतो.अशा उपक्रमाचे आपण कौतुक करायला हवे व ते आपण करतो देखील.आकर्षक हातमोजे व डोक्यावर सुरेख कॅप्स व नजरेत भरेल,अशी वेशभूषा करून हे सर्व कार्यकर्ते सकाळी रामप्रहरी उपाशीपोटी समुद्र किनाऱ्यावर उतरतात.प्रसिद्धी माध्यमाचे प्रतिनिधी देखील आपल्या कॅमेरामनसह हे महान कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांच्यासोबत सज्ज असतात.रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरी लवकर उठायची संवय नसताना देखील ते या कर्तव्यावर हजर होतात.याप्रसंगी समुद्रकिनाऱ्यावर प्रचंड उत्साहाचे वातावरण असते.स्थानिक प्रशासन देखील आपल्या परिसरातील शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींना या महान कार्यासाठी पाचारण करत असतात.सकाळच्या कोवळ्या उन्हात हा इव्हेंट सकाळी ११.०० वाजेपर्यंत चालत असतो.फोटोसेशन झाले रे झाले की मग या सगळ्यांचा परतीचा प्रवास सुरु होतो.अवघ्या तीन तासात समुद्रकिनारा स्वच्छ होतो.मग वर्षभर या समुद्रकिनारी कोणी फिरकत नाहीत.
देशातील समुद्रकिनारे स्वच्छ राहिले तर पर्यावरण अबाधित राहते,असा समज काही पर्यावरण तज्ञानी करून दिल्यामुळे राजकीय पक्षाचे पदाधिकारी हे असे उपक्रम दरवर्षी आपल्या नेत्याच्या वाढदिवशी राबवत असतात.
पण या उत्साही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासोबत आपापल्या भागातील नाले व गटारे देखील स्वच्छ केले तर विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात.हे अस्वच्छ नाले व तुंबलेल्या गटारामध्ये साचणारा कचरा,हा पर्यावरणाची ऐसीतैसी करणारा आहे.पण या महाभागांना नाले व तुंबलेल्या गटाराचे वावडे असते.स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी देखील ” समुद्र किनारेच आपले बरे,” असा विचार करतात व समुद्रकिनाऱ्याना सर्वोच्च प्राधान्य देत असतात.हे असले उपद्व्याप करणारे कचरा उचलून,कचऱ्याच्या डब्यात टाकतानाचे सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकतात.हे सेल्फी त्यांच्या नेत्यांच्या नजरेस पडले की या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून जातो.त्यानंतर हे कार्यकर्ते पुन्हा वर्षभर समुद्रकिनारी पाहायला मिळत नाहीत.हे असे प्रकार तुम्ही – आम्ही वर्षानुवर्षे अनुभवत आलो आहोत.असे इव्हेंट करणाऱ्या राजकीय पक्षांना समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता ही दिखाव्यासाठी गरजेची असली तरी समुद्र,नाले व गटाराच्या पोटातील अस्वच्छतेचे काय ? असा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारायला हवा.

