दीपक मोहिते,
बंजारा समाजही आखाड्यात उतरला ; राज्याची वाटचाल अराजकतेच्या दिशेने …
मराठा,ओबीसी,धनगर व आता बंजारा – वंजारी असे एकामागून एक समाज आरक्षणावरून आक्रमक होत आहेत.ही परिस्थिती पुरोगामी महाराष्ट्राला अराजकाच्या दिशेने नेणारी ठरणार आहे.आपले राज्य हे आता एका वळणावर येऊन पोहोचले आहे.समाजा समाजामध्ये विद्वेष निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ओबीसी व मराठे,या दोन समाजामध्ये आग लावण्याचे काम काही पक्षाच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक केले.त्यांच्या या प्रयत्नाला या समाजाच्या नेत्यांनीही खतपाणी घातले,त्यामुळे राज्यातील सौहार्दाचे वातावरण पार बिघडले व सध्या राज्यात अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.धनगर समाजानेही आता आरक्षणाची मागणी केली आहे.मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पुन्हा न्यायालयात पोहोचला आहे.या सर्व समाजाना आरक्षण मिळेल की नाही,याची शाश्वती नसताना या समाजाचे नेते सर्वत्र आगलावू भाषणे करत सुटले आहेत.त्यांच्या या अशा आगलावू भाषणामुळे तरुणांची माथी भडकत चालली आहे.वास्तविक सरकारची जबाबदारी आहे की समाजा समाजात तेढ निर्माण होऊ देता कामा नये.पण राज्य सरकार त्याविषयी कठोर कारवाई करण्याऐवजी सरकार खतपाणी घालण्यात धन्यता मानत आहे.आज बंजारा व वंजारी समाजात तेढ निर्माण होईल,असे वक्तव्य माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केल्यामुळे वंजारी समाज खवळला आहे.बंजारा व वंजारा हे एकच आहेत,असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले.त्यानंतर वंजारा समाजाच्या तरुणांनी त्यांच्या जाहीर सभेत अक्षरशः हैदोस घातला. ओबीसी नेते छगन भुजबळ हे मंत्रीमंडळात असूनही मंत्रीमंडळाने घेतलेल्या एकमुखी निर्णयाविरोधात जहाल वक्तव्ये करत सुटले आहेत.हा प्रकार भारतीय संविधानाने आखून दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन करणारा आहे.” मी भारतीय,” “,अशा शब्दाने संविधानाची शपथ घेणारे छगन भुजबळ ठराविक समाजाच्या बाजूने तसेच अन्य दुसऱ्या समाजाविषयी विखारी वक्तव्ये करत असतात.त्यांचे हे वागणे,भारतीय संविधानातील अनुच्छेद १५ चे उल्लंघन करणारे आहे. ( धर्म,वंश जात,लिंग व जन्मस्थान या करणावरून भेदभाव करण्यास मनाई ) पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बघ्याची भूमिका घेण्यात धन्यता मानत आहेत.समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होईल,अशा पद्धतीने वक्तव्ये करणारे मग ते जरांगे पाटील असो,छगन भुजबळ असो,लक्ष्मण हाके असो, किंवा धनंजय मुंडे असो,या सर्वांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगाम घातला पाहिजे.अन्यथा फुले,आंबेडकर शाहूंचा हा पुरोगामी महाराष्ट्र विनाशाच्या खाईत जाईल.

