दीपक मोहिते,
निवडणूक पर्व – जिल्हा परिषद / पंचायत समिती निवडणुका, संघर्षाला तोंड फुटले,
पालघर जिल्ह्यात महायुती तुटण्याची शक्यता…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सारे राजकीय पक्ष आतापासूनच एकमेकांच्या उरावर बसू लागले आहेत.महायुतीमध्येही भाजप व एकनाथ शिंदे गटात एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण सुरू झाले आहे.दुसरीकडे बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना त्याच्या कृष्णकृत्याचा पाढा वाचत पक्ष सोडण्यासाठी भाजपकडून दबाव आणण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर रुपेश जाधव यांचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी खूप आतुर झाले आहेत.हे कार्यकर्ते सतत भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत.बहुजन विकास आघाडीचे दोन महत्वाचे पदाधिकारी देखील आपली कृष्णकृत्ये बाहेर येऊ नयेत,त्यासाठी आपल्याला भाजपमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी देव पाण्यात टाकून बसले आहेत.गेल्या आठवड्यात तालुक्यात झालेली मुसळधार वृष्टी,गणेशोत्सव,
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा रायगड दौरा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सतत होणाऱ्या बैठका,त्यामुळे प्रवेश प्रक्रिया काही प्रमाणात थंडावली आहे.पुढील आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला चांगलाच वेग येण्याची शक्यता आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पालघर जिल्ह्यात शिंदे गटाला खिंडार पाडल्यानंतर एकनाथ शिंदे सावध झाले.त्यांनी प्रताप सरनाईक,उदय सामंत व भरत गोगावले,या आपल्या तीन विश्वासू शिलेदारांना पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर पाठवले. त्यांच्या या दौऱ्यानंतर पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ” वरिष्ठानी आदेश दिल्यास आम्ही स्वबळावर या निवडणुका लढवू शकतो,असे जाहीर केले आहे.भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला ही एकप्रकारची चपराक असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.दरम्यान शिंदे गटाचे जगदीश धोडी हे बोईसर विधानसभेची उमेदवारी नाकारल्या गेल्यापासून प्रचंड नाराज आहेत.त्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी सध्या प्रयत्न होत आहेत.ते प्रयत्न जर यशस्वी झाले तर शिंदे गटाला ते त्रासदायक ठरू शकते.येणाऱ्या निवडणुकीत भाजप व शिंदे गटाने आपल्या वेगवेगळ्या चुली मांडल्या तर बोईसरमध्ये या दोघांमध्ये सरळ लढत होण्याची शक्यता आहे.बोईसर व पालघर विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे अस्तित्व सध्या नाममात्र उरले असुन बोईसर विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभव झाल्यानंतर या पक्षाचे सारे काही संपल्यात जमा झाले आहे.झालेल्या पराभवाची कारणे शोधून काढण्याचे प्रयत्न देखील या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून झाले नाहीत.त्यामुळे उरले सुरले कार्यकर्तेही आता पक्षकार्यात सहभागी होत नाहीत.भविष्यात हा पक्ष पुन्हा सावरेल,असे वाटत नाही.वसई तालुक्यात शिंदे गटाची ताकद नगण्य आहे,त्यामुळे शिंदे गटाने आपले लक्ष पालघर व बोईसर,या दोन मतदारसंघावर केंद्रित केले आहे.पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५७ जागापैकी पालघर तालुक्यात १७ जागा आहेत.त्यामुळे शिंदे गटाचा सारा फोकस या तालुक्यावर आहे.पालघर जिल्हा परिषदेवर आपले वर्चस्व निर्माण व्हावे,यासाठी भाजपला पालघर जिल्ह्यात महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवायच्या नाहीत, अशा निर्णयाप्रत आला आहे.

