दीपक मोहिते,
निवडणूक पर्व – प्रभाग क्र.८,
सर्वात बदनाम प्रभाग क्र.८ बविआच्या हातून निसटणार,
नालासोपारा पूर्वेस असलेला हा प्रभाग अत्यंत मागासलेला तसेच ८० % अनधिकृत बांधकामाचा वेढा असलेला प्रभाग म्हणून ओळखला जातो.अठरापगड अस्वच्छता व अश्मयुगातील रस्त्याची आठवण करून देणारा असा हा प्रभाग आहे.या प्रभागात मराठी माणूस अल्पसंख्यांक म्हणून ओळखला जातो.मुस्लिम,उत्तर भारतीय व मारवाडी व्यापारी हे या प्रभागात बहुसंख्यांक आहेत.झोपडपट्या,अनधिकृत चाळी व अनधिकृत इमारती इ.चा प्रचंड सुळसुळाट,जागोजागी कचऱ्याचे ढीग,गुंडाचा मुक्त वावर,गुरुचरण,वन व सरकारी जमिनी या आपल्या बापजाद्यांची जायदाद असल्याची मानसिकता बाळगणारे चाळमाफिया,याना सर्वच राजकीय पक्षांनी पोसले आहे.पाणी,आरोग्य व शिक्षण,कायदा व सुव्यवस्था,स्वच्छता इ. समस्या या प्रभागाच्या पाचवीला पूजल्या आहेत.गेल्या पंधरा वर्षात या प्रभागात विकासकामाचा थांगपत्ता नाही.८० % अनधिकृत चाळींचे साम्राज्य,त्यामुळे या प्रभागावर गुंडांचे किती वर्चस्व असेल,याची तुम्ही आम्ही कल्पनाही करू शकत नाही.
असो, या प्रभागात मतदारांची संख्या इतर प्रभागाच्या तुलनेत सर्वात कमी आहे.एकूण ३९ हजार ८९६ मतदार या प्रभागात आहेत,त्यापैकी अनु.जाती – १ हजार ८५४ तर अनु. जमाती – १ हजार ६०६ मतदार आहेत.त्यामध्ये श्रीरामनगर,धानिवबाग, धानिव तलाव,वालईपाडा,
गरेलपाडा,अल हबीब कंपाऊंड,रफिक कंपाउंड,काशी विश्वनाथ धाम,शिवमंदिर,डोंगरपाडा,धानिव गाव व ९९ एकर,या परिसराचा समावेश आहे.या प्रभागातील अस्वच्छ रस्ते,निमुळत्या गल्ल्या व गलिच्छ चाळी,पाहिल्यानंतर हा प्रभाग महानगरपालिका क्षेत्रात असण्यावर आपला विश्वासच बसत नाही.वास्तविक हा प्रभाग अत्यंत संवेदनशील,असा आहे.या प्रभागातील अनधिकृत बांधकामात मुंबई व अन्य शहरातील अनेक नामचीन गुंड आश्रयाला येत असतात.दिवसा मुंबई सारख्या शहरात उचापती करायच्या व निवांतपणे या भागात रात्र घालवायची, असा या गुंडाचा शिरस्ता.काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस उप अधिकारी महेश पाटील यांनी दर महिन्याला दोन वेळा कोंबिंग ऑपरेशन हाती घेऊन अनेक गुंडांना जेरबंद केले होते.त्यांच्या जाण्यानंतर ही मोहीम थंडावली ती आजतागायत..
या प्रभागावर बहुजन विकास आघाडीचे कायम वर्चस्व राहिले,पण या निवडणुकीत त्यांना या जागा पुन्हा जिंकणे अशक्य आहे.गेल्या दहा वर्षात येथून निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी लोकांच्या अपेक्षेनुसार विकासकामे केली नाहीत,त्यामुळे सत्ताधारी पक्षावर मतदारराजा प्रचंड नाराज आहे.त्यांची ही नाराजी या निवडणुकीत ईव्हीएम मशिनमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.येथे उत्तर भारतीय मतदारांचा सर्वाधिक भरणा आहे,आणि हा मतदार सध्या भाजपकडे झुकलेला आहे.त्यामुळे येथील दोन्ही जागांवर भाजप बाजी मारेल,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.बहुजन विकास आघाडीचा गुंड प्रवृत्तीचा नगरसेवक सीताराम गुप्ता याने आजवर केलेल्या कृष्णकृत्याचा फटका पक्षाला १०० टक्के बसेल,अशी शक्यता बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्तेच खाजगीत बोलत असतात.

