दीपक मोहिते,
विकासकामांना वेग,
अर्नाळा किल्लावासीयांची मुख्य समस्या मार्गी लागण्याची शक्यता,
वाहतुकीच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या अर्नाळा किल्लावासीयांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्यात,यासाठी वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी शासनस्तरावर जोरदार प्रयत्न चालवले आहेत.अनेक वर्षांपासून अर्नाळा किल्ला गाव ते अर्नाळा गाव दरम्यान उड्डाणपूल बांधण्यात यावा,अशी मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी शासनाकडे लावून धरली आहे.या महत्वाच्या योजनेला मंजुरी मिळाली आहे,काही तांत्रिक कारणामुळे मात्र हे काम अनेक वर्षे रखडले आहे.या प्रकरणी आ.स्नेहा दुबे पंडित यांनी हस्तक्षेप करावा,अशी मागणी करण्यात आल्यानंतर आ.दुबे यांनी संबधित विभागाकडून सविस्तर माहिती मागवून घेतली व मुख्यमंत्री कार्यालयाशी त्वरीत पत्रव्यवहार सुरू केला आहे.लवकरच या विषयी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन हा तिढा लवकरात लवकर सोडवणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.
अर्नाळा किल्ला हे गाव तीन ते चार हजार लोकवस्तीचे गाव असून मासेमारी व्यवसाय करणारा कोळी व मांगेला समाज चोहोबाजूने पाण्यानी वेढलेल्या या बेटावर राहत आहे.१९९९ साली तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियममंत्री राम नाईक यांच्या अथक प्रयत्नामुळे या गावात वीज आली.अनेक अडथळे पार करत ना.नाईक यांच्या प्रयत्नामुळे शेकडो वर्षे अंधारात चाचपडणाऱ्या किल्लावासीयांना प्रकाश पाहायला मिळाला.पर्यावरणाचे कायदे आडवे आल्यामुळे या कामाला आर्थिक निधी मिळू शकत नव्हता.अशावेळी राम नाईक यांनी आपल्या अखत्यारीत असलेल्या नऊ पेट्रोलियम ( नवरत्न ) कंपनीचा सीएसआर फंड मिळवला व विजेची यंत्रणा उभारली.नाईक यांच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे अर्नाळा किल्लावासीयांच्या जीवनात खऱ्या अर्थाने उष:काल झाला.सध्या या किल्लावासीयांना या दोन गावातून येजा करण्यासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.पावसाळ्यात हा प्रवास अनेकदा जीवावर बेतत असतो.त्यामुळे स्थानिक जनतेने या दोन गावा दरम्यान उड्डाणपूल बांधण्यात यावा,अशी मागणी लावून धरली आहे.शासनाने ही मागणी मान्य केली आहे.या योजनेचे सर्वेक्षण देखील करण्यात आले आहे.या सर्वेक्षणाच्या वेळी अनेक ग्रामस्थांनी हा पूल हलकी वाहने व दुचाकी येजा करू शकतील,इतका रुंद बांधण्यात यावा,अशी मागणी केली.कारण मत्स्य उत्पादन घेऊन जाण्यासाठी लहान टेम्पो जाऊ शकेल,यासाठी हा उड्डाणपूल रुंद असावा,असे त्यांचे म्हणणे आहे.पण संबधित अधिकाऱ्यांनी योजनेचा खर्च वाढेल व तेवढी आर्थिक तरतूद नसल्याचे स्पष्ट करत या वाढीव काम करण्यास असमर्थता व्यक्त केली.त्यानंतर ही योजना रखडली ती आजतागायत.त्यानंतर नव्याने निवडून आलेल्या आ.स्नेहा दुबे पंडित यांच्याकडे स्थानिकांनी दाद मागितल्यानंतर त्यांनी संबधित विभाग व मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठपुरावा / पत्रव्यवहार सुरू केला.या प्रकरणी लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठकीचे आयोजन करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.त्यामुळे अर्नाळा किल्लावासीयांचा आणखी प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

